K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday 25 December 2018

शाळासिध्दी लेखमाला - 3

 वर्ग खोल्या आणि इतर खोल्या


शाळासिध्दी लेखमाला -  3
शाळासिध्दी – शाळा मूल्यांकनाचा राष्ट्रीय कार्यक्रम -  शाळांच्या सर्वांगिण विकासाचा राजमार्ग
शाळेचे सामर्थ्य स्त्रोत – वर्ग खोल्या आणि इतर खोल्या          (क्षेत्र क्रमांक 1 – गाभामानके क्रमांक 3 )
वर्ग खोल्या आणि इतर खोल्या
वर्गखोली
विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील बराचसा वेळ वर्गखोलीमध्ये जात असतो. त्यामुळे वर्गखोली ही विद्यार्थी अध्ययनास अनुकूल असायला हवी. प्रचलित निकषानुसार शाळेतील वर्गखोल्या शाळेतील शिक्षक संख्येनुसार असायला हव्या. वर्ग खोलीचे आकार आयताकार,वर्तुळाकारचौरसषटकोनी अशाप्रकारचे असू शकतात. परंतु सामान्यत: आयताकार आकाराची खोली ही अध्ययन अध्यापनासाठी व्यवस्थित मानली जाते. प्रत्येक वर्ग खोलीचे माप हे विद्यार्थी संख्येवर अवलंबून असते. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सात ते दहा चौरस फूट जागा असावी असा संकेत आहे. शिक्षकांच्या टेबल खुर्चीसाठी तसेच त्यांना विद्यार्थ्यांमध्ये येण्या जाण्यासाठी जागा असायला हवी. वर्गखोलीची उंची देखिल महत्वाची आहे. खोलीमध्ये भरपूर प्रकाश येण्यासाठी व खोलीतील हवा शुध्द राहण्यासाठी उंची सुमारे 12 ते 18 फूट असायला हवी. वर्गामध्ये 40 ते 50 विद्यार्थी चार -  पाच तास बसणार असतात त्यामुळे हवा शुध्द राहावयास हवी.  हवा आणि प्रकाशाच्या दृष्टीकोनातून खोलीला खिडक्याही भरपूर असाव्यात. खिडक्यांची उंची इतकी असावी की त्यातून येणारा उजेड विद्यार्थ्यांच्या डेस्कवर पडेल आणि खिडक्या साधारण्त: विद्यार्थ्यांच्या डाव्या हाताला असाव्यात . कारण लिहितांना त्यांच्या हाताची सावली पडणार नाही. खिडक्यांना पांढरी काच असल्यास पावसाचे वेळी किंवा उन्हाळ्यामध्ये खिडकी बंद असली तरी वर्गात भरपूर प्रकाश राहतो.
फळा हा शिक्षकाचा मित्र असतो. त्याचे वर्गखोलीतील स्थान अतिशय महत्वाचे असते. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक शिकवित असतांना फळा दिसू शकेल असा असावा. दोन खिडक्यांच्या मध्ये फळा असू नये. प्रत्येक वर्गामध्ये शिक्षकांना अध्ययन अध्यापनाचे साहीत्य ठेवण्यासाठी कपाट असावे. वर्गातील जमीन मातीची किंवा लाकडाची असू नये कारण लाकडाचा आवाज येतो. मातीची असल्यास लवकरच खराब होते. धूळ निघते. त्याचा परिणाम स्वच्छतेवर होतो. खोलीला पांढरा किंवा फिक्कट रंग असावा. हल्ली वर्गखोली ही विद्यार्थ्यांना आवडेल अशा आकर्षक पध्दतीने तयार केल्या जात आहेत. खोलीलाच अध्ययन अध्यापनाचे साहीत्य मानून खोलीच्या भिंतींचा वापर विविध चित्रेतक्ते यासाठी केला जात आहे. वर्ग भिंतीला जमिनीलगत बोलके फळे तयार करुन घेतले जात आहेत. काही शाळांमधून जमिनीलगत फळे तयार करुन विद्यार्थ्यांना त्यावर लेखन करण्याची संधी दिली जाते. वर्गात पाटी न वापरता या फळ्यांचा वापर केला जातो. एवढेच नव्हे तर वर्गातील फरशी देखिल अध्ययन अध्यापनासाठी अनुकूल केली जाते. त्यावर रंगकाम ,चित्रकाम केले जाते. भाषा विषयातील अक्षरशब्द  व वाक्य लेखन,गणितातील अंकबेरीज वजाबाकीची उदाहरणे जमिनीवर सरावासाठी लिहीली जातात. विद्यार्थी मोठ्या आवडीने या जमिनीभोवती बसतात. आनंदाने शब्द लेखन वाक्य तयार करणे,गोष्ट तयार करणे गणित सोडविणे यासारख्या क्रिया करतात. जमिनीप्रमानेच वर्ग खोलीचे छत देखिल आकर्षक व अध्ययन अनुकूल केले जाते. बहुतेक शाळेत छतावर आकाशगंगा दाखविली जाते.
Building As Learning Aid (BALA) – केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयातील एक अभ्यासगट राजस्थान राज्यात सुरु असलेल्या लोक जुंबिश या शैक्षणिक कार्यक्रमाच्या अभ्यासासाठी गेला होता. या अभ्यासगटामध्ये शिक्षणतज्ञासह वास्तूविशारद देखिल होते.  या अभ्यासगटाने राजस्थानमधील 60 शाळांचा अभ्यास केला. अभ्यासभेटी दरम्यान त्यांना शाळांच्या इमारती व वर्गखोल्यांचा वापर शैक्षणिक साधन म्हणून करता येईल काय ? अशी कल्पना सुचली. वास्तूविशारद, शिक्षणतज्ञ व नवोपक्रमशील शिक्षकांच्या मदतीने त्यांनी शाळा इमारत, वर्गखोल्या व शालेय परिसराचा एक आराखडा तयार केला. या आराखड्यालाच पुढे BALA - Building As Learning Aid ( शालेय इमारत/ वर्गखोली एक शैक्षणिक साधन ) असे नाव मिळाले. या अभ्यासगटातील वास्तूविशारद व शिक्षणतज्ञ डॉ कबीर वाजपेयी यांनी यावर सविस्तर लेखन करुन एक पुस्तिका प्रकाशित केलेली आहे. BALA च्या माध्यमातून 150 साधने शालेय इमारत/ वर्गामध्ये तयार करता येतात. ही अभिनव कल्पना सध्या भारतात रुजली असून मोठ्या प्रमाणात लक्षवेधी ठरली आहे. सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत Child Friendly Elements याच आराखड्यानुसार तयात करण्यात आलेले आहे. व्यक्तीच्या विकासात व सामाजिक जडण घडणीमध्ये शाळांचा महत्वपूर्ण वाटा असतो. वैश्विक नागरिक तयार करण्याचे कार्य शाळा करत असते. अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या अत्यंत संवेदनशील टप्प्याला आकार देतांना खुप काळजी घ्यावी लागते. शैक्षणिक गुणवत्ताविकासात वर्गखोली व शैक्षणिक साधने प्रभावीपणे वापरावी लागतात. मुलांच्या जिज्ञासेला व कल्पनाशक्तीला वाव मिळायला हवा. शैक्षणिक साधने ही विद्यार्थ्याला अध्ययन अनुभवाबारोबरच खुप काही शिकवित असतात. वर्गातील साधने तयार करणे, हाताळणे, उपयोजन करणे यासारख्या कृतीतून विद्यार्थी  कौशल्यांचा विकास होत असतो. या सर्वांचा विचार करुन वर्गखोली तयार करायला हवी. वर्गखोली ही फक्त इमारत किंवा खोली नसून विद्यार्थ्यांचा विकासासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण जागा आहे. वर्गखोली विद्यार्थ्याचे कुतूहल जागे करुन त्यांना सक्रिय बनविते. शैक्षणिक साधन म्हणून कल्पकतेने बनविलेली वर्गखोली विद्यार्थ्यांच्या  मनात प्रश्न निर्माण करुन त्यांना उत्तरे शोधायला लावते. समस्या जाणून घ्यावयास उद्युक्त करते. वातावरणाशी समरस होत भविष्य घडवायला मदत करते. शिकणे व शिकविणे हे आनंददायी होण्यासाठी  नाविन्यपूर्ण शैक्षणिक साधन म्हणून वर्गखोलीकडे पाहावयास हवे. वर्गखोलीतील भिंत, फरशी, छत, दारे, खिडक्या, फर्निचर यांचा अध्ययन अध्यापनात जास्तीत जास्त वापर करणे महत्वाचे ठरते.
वर्गखोली बरोबरच शाळेमध्ये खालील खोल्यांची आवश्यकता असते.
1.      मुख्याध्यापक खोली -  शालेय कामकाजामध्ये वर्ग अध्यापनाबरोबरच इतर प्रशासकीय कामे करावी लागतात. जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना निकषानुसार मुख्याध्यापक दिले जातात. मुख्याध्यापकांना आपले शालेय कामकाज करण्यासाठी स्वतंत्र खोली / कार्यालयाची आवश्यकता असते. सर्वच मोठ्या व जास्त पटसंख्येच्या शाळांमधून अशा प्रकारचे मुख्याध्यापक कार्यालय/ खोली दिसून येते. जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळांमधून शाळेच्या वर्गखोलीसमोर असलेल्या पत्र्याच्या शेडचा (पढवी/ व्हरांडा) वापर करुन मुख्याध्यापक खोली तयार केलेली आहे. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत नविन शाळांसाठी  2 खोल्याचे बांधकाम करतांना स्वतंत्र मुख्याध्यापक खोली तयार करण्यात येत आहे. दोन षटकोनी वर्गखोल्यांच्या मध्ये तयार होणा-या जागेचा उपयोग करुन ही खोली तयार केली जाते. त्यामुळे जवळपास सर्वच शाळांमधून मुख्याध्यापक खोली दिसून येते. विविध शाळा अभिलेखे, विद्यार्थी दाखले, प्रवेश व निर्गम विषयक कामकाज व इतर कामे यासाठी मुख्याध्यापक खोली आवश्यक ठरते.
2.      संग्रहालय – कला, साहित्य , विज्ञान व ऐतिहासिक क्षेत्रातील साहित्यांचा संग्रह ज्या ठिकाणी केला जातो त्या ठिकाणाला संग्रहालय असे म्हणतात. ज्ञानग्रहणाचा खरा आधार जिज्ञासा व प्रेरणा आहे. संग्रहालयातील  वस्तूंना पाहिल्यावर विद्यार्थ्यांच्या मनात जिज्ञासा निर्माण होते. विद्यार्थ्यांच्या मनात विविध प्रश्न निर्माण होतात. अशाप्रकारे संग्रहालयातील वस्तूंना पाहून निर्माण झालेले प्रश्न हेच अध्ययनासाठी आवश्यक असतात. हे प्रश्न विद्यार्थ्याला प्रेरणा देतात, कृती करायला लावतात व आपले कृतीयुक्त अध्यापनाचे उद्दीष्ट साध्य होते. संग्रहशीलतेमुळे निरिक्षणाची सवय लागते. निरिक्षणामुळे ज्ञान प्राप्ती होते. विद्यार्थी संख्या व शाळेच्या गरजेनुसार प्रत्येक शाळेत संग्रहालय असायला हवे. शाळा लहान असल्यास अध्ययन अध्यापनासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचा, साहित्यांचा संग्रह शिक्षकाकडे असायला हवा. ज्ञानरचनावादी शाळांमधून अध्ययन साहित्यांचे संग्रह असलेले साहित्य कोपरे तयार केल्याचे दिसून येतात.
3.      सभागृह –  विद्यार्थी सर्वांगिण विकासासाठी शाळा विविध उपक्रमांचे आयोजन करीत असते. सांस्कृतिक कार्यक्रम, विविध नेत्यांची जयंती व पुण्यतिथी, प्रासंगिक कार्यक्रम, वक्तृत्व व विविध स्पर्धा यासारख्या कार्यक्रमासाठी सभागृहाची आवश्यकता असते. प्रत्येक शाळेला विद्यार्थी पटसंख्येचा विचार करुन एक सभागृह असायला हवे. शाळा कमी पटसंख्येची व लहान असेल तर एका वर्गखोलीचा उपयोग सभागृह म्हणून केला जातो. सर्व विद्यार्थी एकाच वेळी एकत्र बसु शकतील अशाप्रकारची रचना सभागृहाची असायला हवी. साधारणपणे सभागृहाचा आकार 60 फूट लांब, 40 फूट रुंद व 25 ते 30 फूट रुंद असावा. सभागृहात शाळेच्या गरजेनुरुप व उपलब्ध तरतुदीनुसार सुविधा असाव्यात. या सुविधामध्ये सर्वांपर्यंत आवाज पोहोचण्यासाठी ध्वनीक्षेपक, बसण्याची सुविधा, प्रवेशासाठी स्वतंत्र दरवाजे, बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र दरवाजे असावेत. पाहुण्यांना बसण्यासाठी , व्याख्यानासाठी , कार्यक्रमासाठी मंच तयार करावयाचा असल्यास तो प्रवेशद्वाराच्या विरुध्द बाजूस असावा. सभागृहामध्ये वायुविजनचा विचार करुन पंखे व खिडक्यांची सुविधा असावी. खाजगी व मोठ्या शाळा , महाविद्यालयामधून हल्ली वातानुकुलित व सर्व सुविधायुक्त सभागृह पाहावयास मिळत आहे.
4.      साहित्य खोली –  विद्यार्थ्यांच्या शारीरिक, भावनिक , बौध्दीक विकासासाठी शाळा विविध कार्यक्रम व उपक्रम घेत असते. यासाठी विविध साहित्यांची आवश्यकता असते. शारीरिक शिक्षण व आरोग्य विषयात फूटबॉल,व्हॉलीबॉल , क्रीकेट, बॅडमिंटन, लांब ऊडी, उंच ऊडी, धावणे इत्यादी शारीरिक खेळाप्रमाणे बुध्दीबळ, कॅरम यासारख्या कौशल्यावर आधारीत खेळाचे साहीत्य ठेवावे लागते. प्रभात फेरी, साहित्य कवायत, सांस्कृतिक कार्यक्रम याबरोबरच क्रिडांगण मोजण्यासाठी, आखण्यासाठी देखिल कितीतरी साहित्याची आवश्यकता असते. स्वच्छता करण्यासाठी , दुरुस्ती करण्यासाठी लागणारे साहित्य शाळेत ठेवावे लागते.  शाळेतील फर्निचर , डेडस्टॉक यासर्व साहित्यासाठी शाळेत स्वतंत्र खोली असते. या खोलीमध्ये साहित्य रचना किंवा मांडणी योग्य पध्दतीने केल्यास पाहिजे असलेली वस्तू किंवा साहित्य सहज प्राप्त करता येते.
5.      ग्रंथालय – बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार प्रत्येक शाळेत ग्रंथालय सक्तीचे करण्यात आलेले आहे. शाळेतील विद्यार्थी संख्या विचारात घेऊन प्रती विद्यार्थी 5 पुस्तके या प्रमाणात ग्रंथालयात पुस्तके असायला हवी. किमान 200 पुस्तके ग्रंथालयात असायला हवी. ग्रंथालयातील पुस्तकांसाठी कपाट असावे. पुस्तके ही विषयानुसार ठेवलेली असावी. विद्यार्थी वाचनासाठी पुस्तके देण्यात यावी. ग्रंथालयात पुस्तक नोंदीसाठी पुस्तक साठानोंद रजिष्टर, पुस्तक देवघेव रजिष्टर असावे. लहान व कमी पटसंख्या असलेल्या शाळेचे ग्रंथालय व मोठ्या व जास्त पटसंख्या असलेल्या शाळेचे ग्रंथालय हे शाळांनी आपल्या शाळेतील विद्यार्थी वय, आवड, शिक्षक व मानसशास्त्राचा आधार घेऊन तयार करायला हवे. आधुनिक  युगामध्ये संगणक, आधुनिक तंत्र व ई मेडीया,  ई साहित्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. यासर्व गोष्टींचा विचार करुन ग्रंथालय तयार करायला हवे.
(ग्रंथालय हे एक स्वतंत्र गाभामानक असल्याने त्याविषयी अधिक माहिती स्वतंत्र लेखामधून देण्यात येणार आहे. )
6.      प्रयोगशाळा – आधुनिक विचार व नवनविन कल्पना यावर आधारीत आजच्या विज्ञानयुगात केवळ पुस्तकी ज्ञानाला महत्व राहिलेले नाही. पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिक कार्य व प्रयोगाला अत्यंत महत्व आलेले आहे. कोणतेही कार्य करतांना सहजता, अचुकता व योग्य गती म्हणजेच कौशल्य असायला हवे. हे कौशल्ये प्राप्त करण्यासाठी कार्याशी संबंधीत सराव विद्यार्थ्याला देणे गरजेचे आहे. हा सराव प्रयोगशाळेमधून देता येतो. कोणतेही प्रात्यक्षिक कार्य तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनात करणे म्हणजे प्रयोग करणे होय. प्रयोगशाळा म्हणजे एक असे स्थान जेथे विद्यार्थ्यांना स्वत;च्या हाताने कार्य करण्याची संधी मिळते. शास्त्रीय भाषेत सांगायचे झाल्यास एक अशी खोली जेथे सर्व यांत्रिक उपकरणे व साधने ठेवलेली आहेत व त्या साधनाद्वारे स्वत:च्या हाताने कार्य पूर्ण करुन निष्कर्ष प्रस्थापित केले जातात, त्या स्थानाला प्रयोगशाळा असे म्हणतात. प्रयोगशाळेत विद्यार्थी ज्या पध्दती स्वीकारतात त्याचे स्वरुप व शास्त्रीय नियम विद्यार्थ्याला स्पष्ट समजतात. त्या ज्ञानाचा बाहेरच्या जगाशी संबंध विद्यार्थ्याला जोडता येतो. म्हणुनच प्रत्येक शाळेमध्ये प्रयोगशाळा अत्यावश्यक करण्यात आलेल्या आहेत.
(प्रयोगशाळा हे एक स्वतंत्र गाभामानक असल्याने त्याविषयी अधिक माहिती स्वतंत्र लेखामधून देण्यात येणार आहे. )

7.      स्वयंपाक खोली –  प्रत्येक सजीवाच्या बाबतीत अन्न हा अतिशय महत्वाचा घटक आहे. शाळेत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला संतुलित आहार वेळेत मिळावा यासाठी शालेय शिक्षण विभागाने मध्यान्ह भोजन योजना सुरु केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या वयाचा व आहाराचा अभ्यास करुन त्याला वेगवेगळ्या प्रकारचा आहार या योजनेमध्ये दिला जातो. मध्यान्ह भोजन योजनेमध्ये केवळ आहारच नव्हे तर स्वच्छता , धान्याची साठवण, अन्न शिजविणे, अन्न वाटप करणे, वेळेचे वितरणाचे व्यवस्थापन , आचारी आरोग्य, विद्यार्थी वजन व आहार विषयक नोंदी  इत्यादी सर्व गोष्टीचा विचार केला जातो. अन्न साठविणे व शिजविणे करीता स्वतंत्र स्वयंपाक खोली असावी असे बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मध्ये नमूद करण्यात आलेले आहे.  विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक शाळेत स्वयंपाक गृह असावे.
(स्वयंपाक गृह हे एक स्वतंत्र गाभामानक असल्याने त्याविषयी अधिक माहिती स्वतंत्र लेखामधून देण्यात येणार आहे. )
8.      स्वच्छतागृह –  स्वच्छता हा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. विद्यार्थी व शिक्षक आरोग्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छतागृह हे सक्तीचे करण्यात आलेले आहे. प्रत्येक शाळेमध्ये मुलांसाठी, मुलींसाठी व विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असायला हवे. स्वच्छतागृहामध्ये पाण्याची सुविधा असावी. मुलांसाठी व मुलींसाठी असलेले स्वच्छतागृह हे परस्पराच्या विरुध्द दिशेला असायला हवे. शालेय इमारतीच्या दक्षिण दिशेला मुलांचे स्वच्छतागृह असल्यास शालेय इमारतीच्या उत्तर दिशेला मुलींचे स्वच्छतागृह बांधण्यात यावे. विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाला उताराचा रस्ता (रॅंम्प) , कमोड पध्दतीचे भांडे असावे.
(स्वच्छतागृह हे एक स्वतंत्र गाभामानक असल्याने त्याविषयी अधिक माहिती स्वतंत्र लेखामधून देण्यात येणार आहे. )
9.      संगणक खोली – अध्ययन व अध्यापनामध्ये संगणक अतिशय प्रभावी माध्यम ठरत आहे. विविध ऍप व संगणकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून शास्त्रीय संकल्पना व आशय अधिक स्पष्टपणे शिकविता येतो. प्रत्येक शाळामधून संगणक असल्यास वेगाने गुणवत्ता साध्य होणार आहे. संगणक साक्षरता ही आधुनिक काळाची गरज झालेली आहे. शहरातील व मोठ्या शाळामधून संगणक लॅब तयार करण्यात आलेल्या असून विद्यार्थ्यांना अध्ययनाच्या संधी निर्माण करुन दिल्या जात आहे. अवघड वाटणारा आशय , संकल्पना विद्यार्थी आवडीने शिकत असतांना दिसत आहे. लहान व कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळामधून देखिल सध्या संगणक उपलब्ध आहेत.
10.  शिक्षक विश्रामिका (स्टाफ रुम) – माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून शिक्षक विश्रामिका असते. वर्ग अध्यापनासाठी माध्यमिक स्तरावर विषयनिहाय शिक्षक असतात. आपल्या विषयाची तासिका नसतांना शिक्षक विश्रामिकामध्ये शिक्षक संदर्भ ग्रंथाचे वाचन, विद्यार्थी नोंदी, उत्तर पत्रिका तपासणे, निबंध, स्वाध्याय, गृहपाठ इत्यादी तपासणी करण्याचे कार्य करत असतात.

नामांकित मोठ्या शाळामध्ये व आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये वर उल्लेख केलेल्या खोल्याबरोबरच भाषा, गणित,विज्ञान, इतिहास, भूगोल, कला, क्रिडा, कार्यानुभव इत्यादी विषयाच्या विषय निहाय खोल्या असतात. या खोल्या संबंधित विषयाचा अभ्यासक्रम, अध्ययन अध्यापन साहित्य व उपकरणासह अद्ययावत अशा तयार केलेल्या असतात. यासोबतच स्वतंत्र प्रेक्षागृह व करमणूक हॉल तयार केलेले असतात.
शाळेमध्ये वरीलप्रमाणे वर्गखोल्याशिवाय इतर खोल्या उपलब्ध असतात.  
शाळा लहान व कमी पटाची असल्यास वरील खोल्यांची शैक्षणिक गरज  महत्व विचारात घेऊन एकाच खोलीमध्ये दोन / चार विषयाच्या अध्ययन अध्यापनासाठी आवश्यक असलेले साहित्य व सुविधा केलेल्या असतात.  
 केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचनेनुसार व  बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार वर्गखोली व इतर खोलीसंदर्भात दिलेले निकष.
v  प्राथमिक शाळेतील 30 विद्यार्थी संख्या व उच्च प्राथमिक शाळेतील35 विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्र वर्ग खोली असावीखोलीचे क्षेत्रफळ 490चौरस फूट (व्हरांड्यासहइतके असावे.  
v  वर्ग खोलीचे बांधकाम पक्के असावे.
v  वर्गखोलीत विद्युतीकरण तसेच लेखनासाठी फलक असावा.
v  वर्गात हवा खेळती रहावी  याकरिता पुरेशा खिडक्या असाव्यात
v  सर्व वर्गखोल्यांचे बांधकाम पक्के व भूकंपरोधक असणे आवश्यक असून पक्के म्हणजेच आरसीसी असावे.
v  प्रत्येक वर्गखोली करिता एक किंवा शाळेमध्ये किमान दोन याप्रमाणे अग्निशमन यंत्र उपलब्ध करावी.
v  प्रत्येक वर्गखोली करिता एक किंवा शाळेमध्ये एक वैद्यकीय प्रथमोपचार पेटी उपलब्ध असावी.
v  अग्निशमन यंत्राची व वैद्यकीय प्रथमोपचार पेटीची तपासणी दर तीन महिन्यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिकशिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यामार्फत करावी.
वरील निकष हे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांकरिता लागू राहतील.
वर्ग खोल्या आणि इतर खोल्यांच्या बाबतीत खालील महत्त्वाचे प्रश्न शाळासिद्धी मध्ये विचारले जातात.
1)      शाळेत उपलब्ध वर्गखोल्यांची संख्या ?
2)     शाळेत उपलब्ध इतर खोल्यांची संख्या (कृपया उल्लेख करावा) ?
3)      विविध उद्देशासाठी उपलब्ध इतर खोल्या (वर्गखोल्या व्यतिरिक्त) प्रत्येक खोलीच्या वापरासह लिहावे.
4)    ग्रंथालयासाठी स्वतंत्र खोली आहे काय ?
5)     प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र खोली आहे काय ?
6)     शालेय पोषण आहारासाठी  स्वतंत्र खोली आहे काय ?
7)     शाळेत स्वच्छतागृह आहे काय ?

मुख्याध्यापक व निर्धारकांनी वर्णनविधाने वाचन करुन आपल्या शाळेला कोणते वर्णनविधान लागु होतात हे ठरवावेवर्णनविधानाची निवड करतांना अतिशय प्रामाणिकपणे व वस्तूनिष्ठणे करावी.
वर्णन विधानानुसार गुणदान खालीलप्रमाणे.
1)      a) वर्गखोल्या भरगच्च आहेत मुख्याध्यापकांच्या खोलीशिवाय इतर खोली उपलब्ध नाही. फर्निचर उपलब्ध आहे मात्र अपुरे आहे.
b) वर्ग खोली व इतर खोल्यांमध्ये वायुवीजन असमाधानकारक आहे. नैसर्गिक व दिव्यांचा प्रकाश अपुरा आहे. काही खोल्यांमध्ये निम्न दर्जाचे फलक व काही तक्तेनकाशे आहेत. फर्निचर निम्न दर्जाचे व दुरुस्तीची गरज असणारे किंवा बदलण्याची गरज असणारे आहेत.
वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 1 गुण देण्यात यावे. )
2)      a) काही वर्ग भरगच्च आहेतमुख्याध्यापक व शिक्षकांसाठी खोल्या उपलब्ध आहेत. शाळेच्या गरजेपुरते पुरेसे फर्निचर उपलब्ध आहे.
b) खोल्यांमध्ये वायुविजन चांगले आहे. नैसर्गिक प्रकाश व आवश्यक तेथे पंखे आहेत. बहुतांश खोलीमध्ये भिंतीवर नकाशे व तक्ते टांगलेले आहेत. फर्निचर आरामदायक व विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार आहेत.
वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 2 गुण देण्यात यावे)
3)      a) विद्यार्थी गटकार्य व इतर उपक्रमासाठी सर्व वर्गखोल्या पुरेशी जागा आहे.कार्यालय, भांडार, कला इत्यादीसाठी वेगवेगळ्या खोल्या आहेत. प्रत्येक खोलीत पुरेसे बाक व खुर्च्या आहेत. शिक्षकांना कपाट व लॉकर्स आहेत.
b) प्रत्येक वर्गखोलीत वायुवीजन व प्रकाश चांगला आहे. इतर खोल्या सुसज्ज आहेत. आकर्षक वातावरण निर्मितीसाठी चित्रांचा वापर केला आहे. फर्निचर व्यवस्थित व आकर्षक लावलेले आहे. वयानुरूप व विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या अनुरूप फर्निचर आहे.
 ( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 3 गुण देण्यात यावे. )
वर्णनविधाने ही गुणवत्तेचे वर्णन करताततसेच गुणवत्तेचा चढता क्रम दर्शवितात.त्यामुळे शाळेला स्वत:चे स्थान समजतेगाभाघटकाचे सर्व गुण मिळवायचे असल्यास शाळेने नेमकेपणाने काय करावे हे समजतेवर्णनविधानाची निवड केल्यानंतर शाळेला स्वतचे गुणवत्तेमधील स्थान समजतेत्यानंतर प्रत्येक शाळेला सुधारणेसाठी नियोजन करावे लागतेया नियोजनात सुधारणेचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतोप्राधान्यक्रमानुसार प्रस्तावित कार्यवाही कोणती करणार हे नमूद करावे लागतेया कार्यवाहीसाठी किती कालावधी लागणार याचा उल्लेख करावा लागतोअशाप्रकारे कालबध्द व नियोजनबध्द सुधारणेचे नियोजन तयार होते.

संकलित

No comments:

Post a Comment