शाळासिध्दी लेखमाला - 1
शालेय आवार (शालेय परिसर)
शाळासिध्दी लेखमाला - 1
शाळासिध्दी – शाळा मूल्यांकनाचा राष्ट्रीय कार्यक्रम - शाळांच्या सर्वांगिण विकासाचा राजमार्ग
शाळेचे सामर्थ्य स्त्रोत – शालेय आवार (क्षेत्र क्रमांक 1 – गाभामानके क्रमांक 1 )
शालेय आवार (शालेय परिसर)
1. शाळेचे सामर्थ्य स्त्रोत (भौतिकसुविधा)–
शालेय आवार (शालेय परिसर)- शालेय भौतिक सुविधांचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर व अध्यापकांच्या अध्यापनावर होत असतो. विद्यार्थी दिवसाचे 6/7तास शाळेत असतात. अशावेळी ते ज्या भौतिक वातावरणात राहतात ते वातावरण उत्साही, स्वास्थपूर्ण, मनाला प्रसन्न करणारे असणे आवश्यक आहे.असे वातावरण निर्माण करण्याचे कार्य शालेय आवार करते. शालेय आवार किंवा शालेय परिसर शाळेच्या सामर्थ्याचा महत्वाचा घटक आहे. जेंव्हा आपण एखाद्या परिसराचा उल्लेख करतो तेंव्हा त्या परिसरातील कितीतरी बाबी आपल्या डोळ्यासमोर येतात. उदाहरणार्थ आपण रेल्वे स्टेशन असा उल्लेख केल्यास आपल्या डोळ्यासमोर प्लेटफॉर्म, लोखंडी रुळ, शेड, सिग्नल, दुकाने, घड्याळ,दर्शक फलक, सुरक्षा यंत्रणा व आसपासच्या कितीतरी गोष्टी दिसुन येतात.अगदी त्याच प्रमाणे शालेय परिसर म्हटला की शालेय इमारत, वर्गअध्ययन अध्यापन कार्यासाठी उपयोगात येणा-या खोल्या, ग्रंथालय, प्रयोग शाळा , धान्य साठवणूक, इतर शालेय कामकाजासाठी वापरण्यात येणा-या खोल्या यांचा समावेश होतो. या बरोबरच शालेय वातावरण प्रसन्न व आनंददायी बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या शालेय बगीचा, वृक्षारोपण, शालेय कुंपण (वॉल कम्पांऊंड),रंगकाम, सजावट यांचादेखिल समावेश होतो. शाळा मोठी असेल तर शालेय इमारत रचना, प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते, दिशादर्शक फलक, लॉन(हिरवळ),सभागृह,पार्कींग,स्वच्छतागृहे इत्यादींचा समावेश होतो. शालेय परिसरातील प्रत्येक गोष्टीचे महत्व आहे. विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासामध्ये बौध्दीक विकास, शारीरिक विकास, मानसिक विकास, भावनिक विकास,सांस्कृतिक विकास, दृष्टीकोन व विविध कौशल्यांचा विकास यांचा समावेश होतो. वरील सर्व विकास कार्यात शालेय परिसर महत्वाची भूमिका पार पाडीत असतो. शालेय परिसर आकर्षक असल्यास त्या शाळेत बालकांना व पालकांना प्रवेश घ्यावा असे वाटते. घरातील वातावरणामधून विद्यार्थी शालेय परीसरात आल्यानंतर त्याचे मन प्रसन्न असणे आवश्यक असते. प्रसन्न वातारणामध्ये अध्ययनाची गोडी वाढते. शालेय कामकाजाची सुरुवात प्रसन्नपणे व्हावी याकरीताच शालेय परिपाठाचे आयोजन असते. विद्यार्थी अध्ययनास तयार व्हावा, अध्ययनासाठी मानसिक व शारीरिक तयारी व्हावी यासाठी शालेय परिपाठ घेतला जातो. शालेय आवार हे विद्यार्थ्यांना परिपाठासाठी मोकळेपणाने बसता यावे इतके मोठे असायला हवे. शाळेला काही प्रसंगी शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करता यावे यासाठी सभागृहाची आवश्यकता असते. सभागृहामुळे विविध सांस्कृतिक कार्यक्रम परिणामकारकपणे घेता येतात. शालेय आवार व शालेय आवारात सहभागी सर्व घटकांचा वापर हा विद्यार्थ्यांना सहज करता यावा तसेच सर्व ठीकाणी विद्यार्थी सुरक्षा लक्षात घेतलेली असावी. सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक ठीकाणी व्यवस्था असणे आवश्यक ठरते. वापर , सुरक्षा व उपयोगीता ही अत्यंत महत्वाची बाब ठरते. शालेय परिसरामध्ये विद्यार्थ्यांचा शारीरिक विकासासाठी विविध क्रीडा प्रकारचे खेळ घेण्यासाठी क्रिडांगणे असायला हवी.त्याच बरोबर मधल्या सुटीत वर्गाबाहेर बसण्यासाठी जागा, शक्य असल्यास मोठ्या झाडांची सावली असावी. शालेय परिसर म्हणजे शाळेच्या इमारतीच्या आसपासची भौतिक स्थिती असेही म्हटले जाते. शाळा नव्याने सुरु करतांनाच शालेय परिसराच्या बाबतीत पुढील बाबी लक्षात ठेवाव्यात.
1. शाळा वस्तीपासून किंचित दूर असावी.
2. प्रत्येक विद्यार्थ्यास शाळा प्राथमिक असल्यास 1 किमी व माध्यमिक असल्यास 2 किमी पेक्षा जास्त अंतर शाळेत पोहोचण्यासाठी असू नये.
3. शाळा शहरातील भर वस्तीत असू नये.
4. शाळेजवळ कारखाने, सिनेमागृह, दफनविधी स्थान, कचरा डेपो इत्यादी असू नये.
5. शाळेभोवती मैदान असावे.
6. शाळा पानथळ जागी असू नये.
7. शाळेत पोहोचण्यासाठी पक्का रस्ता असावा.
8. शाळेला लागून मोठ्या इमारती असू नयेत.
शाळा वर्ग खोल्यासह इतर खोल्या स्वच्छतागृहे , स्वयंपाक गृहे प्रयोगशाळा,ग्रंथालय यांच्या एकत्रित विचारातून शालेय इमारत उभी असते.शाळा इमारतीमध्ये मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र खोली / कार्यालय असते.मुख्याध्यापक कार्यालय हे शालेय इमारतीमध्ये अशाप्रकारे असावे जेणेकरुन सर्व वर्ग व शालेय परिसर देखिल मुख्याध्यापकांच्या नजरेच्या टप्प्यात यावेत. शालेय इमारत ही अनेक आकाराची असू शकते. प्रत्येक आकाराचे काही फयदे तोटे आहेत. शालेच्या वर्तमानकालीन व भविष्यकालीन गरजा लक्षात घेऊन शाळा इमारतीचा आकार असावा. I, L, O, U, E अशा विविध आकारात बांधल्या जातात. या सर्व प्रकारात इंग्रजी E आकारातील रचना ही मोठ्या शाळांसाठी उपयोगी ठरते. शालेय परिसरात असलेले मुलांचे व मुलींचे स्वच्छतागृहे हे शक्यतो इमारतीच्या परस्परांच्या विरुध्द दिशेला असायला हवे. पिण्याचे पाणी हे देखिल परिसराच्या मध्यवर्ती ठीकाणी व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुविधायुक्त असावे.सांडपाण्याचे नियोजन केलेले असावे.
इमारतीच्या बाबतीत आवश्यक बाबी –
1. प्रत्येक विद्यार्थ्यास कमीत कमी 07 चौरस फूट जागा गृहीत धरुन वर्ग खोल्यांचे क्षेत्रफळ निश्चित करावे.
2. प्रयोगशाळा, ग्रंथालय, सभागृह इत्यादी शक्यतो वर्गखोल्यापासून दूर असावे.
3. भरपूर सूर्यप्रकाश वर्गात येईल असे दक्षिण – पूर्व दिशेने बांधकाम असावे.
4. इमारत पक्की असावी.
5. खिडक्या भरपूर असाव्यात व उंचावर असाव्यात.
6. इमारत रंगकाम केलेले असावे.
7. ठराविक कालावधित दुरुस्ती व रंगकाम केलेले असावे.
वरील सर्व बाबी या मोठ्या शाळांसाठी असल्या तरी त्यामुळे लहान शाळांना मार्गदर्शक अशा आहेत.
बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 व शासन निर्णय दिनांक 29 जून 2013 नुसार शालेय आवार व परिसराबाबत खालील निकष व नियम यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
अ) शालेय आवार –
* प्रत्येक शाळेला प्रवेशद्वारासह संरक्षक भिंत असावी.
* पक्की संरक्षक भिंत शक्य नाही तेथे तारेचे कुंपण, डीडोनिया / मेहंदी सारख्या वनस्पतीचे
कुंपण(green fencing) असावे.
* जेथे वाहतुकीचा रस्ता, जंगली श्वापदे, कॅनॉल, ओढा, नदी असे अडथळे आहेत तेथे पक्की
संरक्षकभिंत असावी.
* आवारभिंतीची उंची जमिनीपासून किमान सहा फूट असावी. व प्रवेशद्वार दहा फूट रुंद असावे.
* शाळेच्या आवारामध्ये निलगिरी, सुरु, गुलमोहोर, व कडुलिंब यासारख्या मोठ्या झाडांची लागवड
सावलीसाठी करावी.
शासन निर्णयामध्ये शालेय आवारात शाळेत किमान कोणकोणत्या बाबी असायला हव्यात याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तसेच प्रत्येक शाळेने वरील निकषाची पूर्तता करण्याचे सांगितले आहे. शाळा जर वरील निकषाची पूर्तता करीत नसेल तर पूर्ततेसाठी तीन वर्षाचा कालावधी देण्यात आलेला आहे.
शाळासिध्दी कार्यक्रमात प्रत्येक गाभामानकांचा विचार उपलब्धता, पर्याप्तता व उपयोगीता या तीन दृष्टीकोनामधून केला जातो.
1. शालेय आवार उपलब्ध आहे काय ?
2. शालेय आवार पर्याप्त आहे काय ?
3. शालेय आवार उपयोगी आहे काय ?
या तीन प्रश्नांची उत्तरे ही प्रत्येक शाळेने स्वत: च्या विकासासाठी प्रामाणिकपणे दिल्यास त्या शाळेची गुणवत्ता दिसून येते. एखाद्या शाळेत शालेय आवार आहे ही झाली उपलब्धता. त्या शाळेतील सर्व मुले आवारात परिपाठासाठी बसू शकतात तसेच विविध क्रीडाप्रकारासाठी, विविध कार्यक्रमासाठी शालेय आवार पुरेसे आहे ही झाली पर्याप्तता. या दोन्ही पेक्षा महत्वाचे ठरते ती आहे उपयोगिता .उपयोगिता म्हणजेच गुणवत्ता. शाळेतील आवार हे समतल आहे. शालेय आवार हे विद्यार्थी अध्ययन अध्यापनास अनुकुल करण्यासाठी शालेय इमारत रंगकाम केले जाते. शालेय भिंती व शालेय कंपांऊंडवर विविध अध्ययन पुरक चित्रे,आशय लिहीलेले आहेत. शालेय आवारात हिरवळ, फुलझाडे, आकर्षक प्रवेशद्वार, दिशादर्शक फलक आहेत. विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचा विचार करून सुख सुविधा आहेत. शालेय आवार किंवा परिसराचे अंतरंग व बाह्यरंग दोन्हीचा विचार विद्यार्थी विकासासाठी केलेला आहे. अशावेळी वरील सर्व बाबीमधून त्या गाभामानकाची उपयुक्तता दिसून येते. म्हणजेच गुणवत्ता दिसून येते. गुणवत्ता ही उपलब्धतेकडून पर्याप्तता व शेवटी उपयोगीता अशी वाढत जाते. शाळासिध्दी कार्यक्रमामध्ये या तीन प्रश्नावर आधारीत वर्णन विधाने आहेत.वर्णन विधाने ही देखिल उपलब्धता, पर्याप्तता व उपयोगीता अशीच गुणवत्ता दर्शवितात. प्रत्येक शाळेने या तीन प्रश्नानुसार व वर्णन विधानानुसार आपल्या शाळेची स्तर निश्चिती करावयाची असते. निवडलेल्या वर्णन विधानानुसार आपल्या शाळेची नेमकी स्थिती समजल्यानंतर शाळेला आपल्या विकासाचा आराखडा तयार करता येतो. विकास आराखड्याचा पुढील टप्पा कोणता याचे ही मार्गदर्शन शाळासिध्दी वर्णन विधाने करतात. या आराखड्यामध्ये विकासाचा प्राधान्यक्रम ठरऊन नियोजनबध्द पध्दतीने शाळेचा विकास घडऊन आणता येतो. यामध्ये एक वर्षात साध्य करावयाची भौतिक सुविधा व गुणवत्ता, दोन वर्षात साध्य करावयाची भौतिक सुविधा व गुणवत्ता, तीन वर्षात साध्य करावयाची भौतिक सुविधा व गुणवत्ता निश्चित करता येते. एक प्रकारे शाळेच्या विकासाचा परिपूर्ण असा आराखडा तयार होतो.
शालेय आवार / परिसराशी संबंधीत खालील प्रश्न मूल्यमापन प्रक्रीयेमध्ये विचारले जातात. उपयुक्तता किंवा गुणवत्ता केवळ याच प्रश्नाशी संबंधित आहे असे नाही. सदर प्रश्न हे केवळ त्या गाभामाणकांच्या विषयी माहीती घेण्यासाठी प्रातिनिधीक स्वरुपात विचारण्यात आले आहेत. या प्रश्नाच्या उत्तरापेक्षा गुणवत्ता ही मोठी बाब आहे.
शालेय आवाराच्या बाबतीत खालील महत्त्वाचे प्रश्न शाळासिद्धी मध्ये विचारले जातात.
1) शालेय आवाराचे एकूण क्षेत्र ?
(चौरस मीटर किंवा चौरस फुटामध्ये )
2) शाळेच्या इमारतीची स्थिती - चांगली / किरकोळ दुरुस्तीची गरज /इमारत नाही / मोठ्या दुरुस्तीची गरज
3) इमारतीची नियमित देखभाल केली जाते काय?
4) जागेचा मालकी हक्क कोणाचा ?
5) शाळेचे मैदान समतल आहे काय ?
6) शाळेला प्रवेश द्वार आहे काय?
7) शाळेला संरक्षक भिंत / तारेचे कुंपण विटांची भिंत / मेहंदी / डीडोनिया इत्यादी वनस्पतीचे कुंपण / इतर आहे काय ?
8) इमारतीचे एकूण क्षेत्रफळ - (चौरस मीटर किंवा चौरस फुट मध्ये )
9) शाळेत झाडेझुडपे हिरवळ फळझाडे परसबाग आहे काय?
10 ) परिसरात मोठी झाडे आहेत काय ?
11) प्रार्थना परिपाठ यासाठी पुरेशी जागा आहे काय ?
12 ) इतर कार्यक्रम घेण्यासाठी पुरेशी जागा आहे काय ?
13 ) शालेय परिसर स्वच्छ व सुंदर आहे काय ?
14 ) शालेय इमारत व जागा याबाबतीचे मालकी हक्काबाबतचे दाखले व कागदपत्रे शाळेत उपलब्ध आहेत काय ?
15) शालेय इमारतीची दुरुस्ती केव्हा झाली ?
16) नूतनीकरण सजावट इतर कामे याबाबतचे दाखले किंवा रजिस्टर किंवा ठराव इमारत दुरुस्तीचा दिनांक
17) शालेय स्वच्छतेबाबतच्या नोंदी नोंदवह्या इतर नोंदी उपलब्ध पुरावे आहेत काय ?
वरील प्रश्नांचा हेतू हा शालेय परिसराशी संबंधीत माहीती मिळविणे या बरोबरच शालेय परिसराचे संपूर्ण चित्र समोर उभे करणे आहे. शाळासिध्दीमध्ये प्रत्येक घटकाचा सुक्ष्म विचार केला जातो. स्वयं मूल्यमापन व बाह्य मूल्यमापन करण्याआधी मुख्याध्यापक व निर्धारकांनी वरील माहीतीचा अभ्यास शाळा विकासाच्या दृष्टीकोनातून करणे आवश्यक आहे. वरील माहीतीनंतरच वर्णनविधाने अभ्यासणे उचित ठरते. शाळासिध्दी कार्यक्रमामध्ये उपलब्धता,पर्याप्तता व उपयोगिता या तीनही दृष्टीकोनातून वर्णनविधाने तयार केलेली आहे.त्यानुसार गुणदान केलेले आहे. मुख्याध्यापक व निर्धारकांनी वर्णनविधाने वाचन करुन आपल्या शाळेला कोणते वर्णनविधान लागु होते याची निवड करावी.वर्णनविधानाची निवड करतांना वरीलप्रमाणे वस्तूस्थिती दर्शक प्रश्न, प्रत्यक्ष परिस्थिती, विद्यार्थी शिक्षक मुलाखती, दाखले, पुरावे यांचा आधार घ्यावा.वर्णनविधानाची निवड ही अतिशय प्रामाणिकपणे व वस्तूनिष्ठ्पणे करावी.
वर्णन विधानानुसार गुणदान खालीलप्रमाणे.
1) a) शालेय परिसरामध्ये मोकळी जागा आहे. परंतू मोकळी जागा ही अपुरी व परीपाठासाठी मर्यादित आहे. कच्ची अर्धी पक्की तंबू प्रकारची इमारत उपलब्ध आहे सुरक्षा भिंत किंवा कुंपण अस्तित्वात नाही किंवा सलग नाही. मोठ्या अंतरावर आहे. कुंपणाच्या आत बगीचा किंवा झाडे नाहीत.
b) मोकळी जागा केवळ परीपाठासाठी वापरली जाते. मैदान समतल आहे.आवार स्वच्छ व सुव्यवस्थित ठेवलेला नाही . जमीन खिडक्या इत्यादी मध्ये मध्ये मोठ्या दुरुस्तीची गरज आहे .
( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 1 गुण देण्यात यावे. )
2) a) मोकळी व बांधकाम केलेली जागा सभागृह प्रार्थनेच्या जागेसह पुरेशी आहे मात्र सर्व विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी अपुरी आहे. सुरक्षा भिंत आहे मात्र प्रवेश द्वारा विना. पक्की इमारतीत अस्तित्वात आहे. कुंपणा मध्ये काही झाडे व बगीचा आहे.
b) परीपाठाची जागा सभागृह शारीरिक कसरती व कार्यक्रमाचे आयोजन इत्यादी सारख्या इतर उपक्रमांसाठी वापरली जाते. मैदान समतल आहे. जमीन भिंती छत दरवाजे यांच्या किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता आहे. प्रसंगी देखभाल केली जाते.
( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 2 गुण देण्यात यावे. )
3) a) प्रार्थनेसाठी ठराविक जागेसह विद्यार्थ्यांच्या मुक्त संचारासाठी भरपूर मोकळी व बांधलेली जागा आहे. प्रवेश द्वार व झुडपासह सुरक्षा भिंत, कुंपण अस्तित्वात आहे. सुस्थिती ठेवलेली बाग व हिरवळ आहे.
b) मोकळी जागा व इमारत स्वच्छ व नीटनेटके देखभाल केलेली आहे. वेळोवेळी दुरुस्ती केली जाते.
( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 3 गुण देण्यात यावे. )
वर्णनविधाने ही गुणवत्तेचे वर्णन करतात. तसेच गुणवत्तेचा चढता क्रम दर्शवितात. त्यामुळे शाळेला स्वत:चे स्थान समजते. गाभाघटकाचे सर्व गुण मिळवायचे असल्यास शाळेने नेमकेपणाने काय करावे हे देखिल समजते.वर्णनविधान निवड केल्यानंतर शाळेला स्वत: चे गुणवत्तेमधील स्थान समजते.त्यानंतर प्रत्येक शाळेला शाळेला सुधारणेसाठी नियोजन करावे लागते. या सुधारणेसाठी नियोजनात सुधारणेचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो.प्राधान्यक्रमानुसार प्रस्तावित कार्यवाही कोणती करणार हे देखिल नमूद करावे लागते. या कार्यवाहीसाठी किती कालावधी लागणार याचा देखिल उल्लेख करावा लागतो. अशाप्रकारे कालबध्द व नियोजनबध्द सुधारणेचे नियोजन तयार होते.
अशाप्रकारे शाळासिध्दी कार्यक्रमामध्ये शाळा आवार / शाळा परिसराचे महत्व अनन्यसाधारण आहे.
संकलित
No comments:
Post a Comment