K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Monday, 24 December 2018

दहावीचं टेन्शन कशाला?

    दहावीची परीक्षा आणि अभ्यास याचा अनेकजणं धसकाच घेतात. म्हणूनच या विद्यार्थ्यांचं टेन्शन घालवण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स आणि एडनेक्स या संस्थेने 'दहावीच्या यशाचा कानमंत्र' या सेमिनारचं आयोजन केलं होतं.
संकलनः कल्पना पाटील

​     दहावीची परीक्षा आणि अभ्यास याचा अनेकजणं धसकाच घेतात. म्हणूनच या विद्यार्थ्यांचं टेन्शन घालवण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स आणि एडनेक्स या संस्थेने 'दहावीच्या यशाचा कानमंत्र' या सेमिनारचं आयोजन केलं होतं.

     दहावी म्हणजे आयुष्यातील पहिली बोर्डाची परीक्षा. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी हसतखेळत दहावीचा अभ्यास कसा करावा, याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स आणि एडनेक्स या संस्थेतर्फे 'दहावीच्या यशाचा कानमंत्र' या सेमिनारचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. मागील वर्षांतील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले अनुभव कथन केले. सुरुवातीपासून अभ्यास कसा करावा, पेपर किती आणि कसे सोडवावेत, वेळापत्रक किती महत्वाचं आहे, हॉटसच्या प्रश्नांचा सराव कसा करावा, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या सेमिनारमधून मिळाली.
अभ्यास नेमका कसा करावा?

सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त पालक किंवा शिक्षकांनी सांगितलंय म्हणून अभ्यास करू नका. स्वतःच स्वतःला अभ्यासाची शिस्त लावून घ्या. आपल्या भविष्यासाठी अभ्यास करा. त्याबद्दलची भीती मनातून काढून टाका. अभ्यासक्रम मोठा आहे, तो कसा पूर्ण होणार; अशी भीती मनातून काढून टाका. कोणताही टॉपिक ऑप्शनला टाकू नका. परीक्षेत ९५ टक्के प्रश्न हे तुमच्या क्रमिक पाठ्यपुस्तकातीलच असतात. त्यामुळे सगळ्यात आधी ते नीट वाचा. दहावीत तुम्हाला १० ते १२ च धडे असतात. त्यामुळे त्याचे छोटे छोटे भाग करा. ते नीट वाचा. समजून घ्या. घोकमपट्टी केलीत तर उपयोग नाही. समजून घेतलंत, तर अनेक प्रश्नांची उत्तरं तुमची तुम्हालाच सापडतील. स्वतःची प्रश्नपत्रिका तयार करा आणि त्यांची मुद्देसूद उत्तरे लिहिण्याचा सराव करा. मुख्य परीक्षेत दिलेल्या सूचनांचं पालन करा. मुद्देसूद उत्तरे लिहा. उगाच फापटपसारा नको. अभ्यासाची तुमची अशी एक पद्धत बनवा. रोज दिवसभर अभ्यास करणं सक्तीचं नाही. दिवसातील काहीच तास अभ्यास करा, मात्र तो मन लावून करा. प्रत्येक विषयाला रोजचा किमान दोन तास तरी वेळ द्या. एकाच वेळी एकाच विषयावर फोकस करा. अभ्यास करताना विषयाची वर्गवारी करा. गणित आणि विज्ञान हे विषय एकमेकांशी संबधित असल्याने त्यांचा अभ्यास एकत्र करा. त्यानंतर समाजशास्त्रासारख्या (सोशल सायन्स) स्कोअरिंग विषयाकडे लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाषांसाठी अधिक वेळ द्या. कारण बरेचदा भाषेचा पेपर लिहिताना वेळ पुरत नाही अशी ओरड करताना विद्यार्थी दिसतात. त्यामुळे भाषांसाठी जास्त सराव करा. याचबरोबर अवांतर वाचनही हवंच.

लक्षात राहण्यासाठी काय करू?

वाचलेलं लक्षात राहत नाही, शिकवलेलं तेवढ्यापुरतं कळतं पण घरी आल्यावर ते अवघड वाटतं, अशा अनेकांच्या तक्रारी असतात. या सगळ्याचं कारण आपणच असतो. एकतर आपण वाचताना नीट लक्ष देत नाही, त्यामुळे धड्यांतलं साम्य आणि फरक आपल्याला कळत नाही. पक्कं समजलं नाही की ते पुन्हा वापरता येत नाही. मग असा सगळा गोंधळ होऊन बसतो. या समस्यांवर मेहनत, चिकाटी आणि सरावाद्वारे मात करता येते.

काय करावे?

पाठ्यपुस्तक खूपदा वाचा. स्वतःच्या हाताने नोट्स काढा. अडलेल्या प्रश्नांसाठी शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या.

लक्षात राहत नसेल तर खूपवेळा ते लिहून काढा. त्यामुळे ते तुमच्या लक्षात राहील आणि लिहिण्याचा सरावसुद्धा होईल.

इतिहासातील सनावळ्या, गणिताची टेबल्स आणि प्रमेयं, विज्ञानातील फॉर्म्युले तुमच्या अभ्यासाच्या टेबलावर अथवा सहज दिसतील अशा जागी चिकटवा. कारण सतत नजरेखालून गेल्याने ते तुमच्या चांगले लक्षात राहील.

तुम्ही एका धड्याचे बारा, याप्रमाणे छोटे छोटे फ्लॅशकार्ड्स बनवू शकता. जेणेकरून ते तुमच्या खिशात सहज मावतील आणि मोकळ्या वेळात, प्रवासात ते वाचल्यास तुमचा छान अभ्यास होईल.

आजची जनरेशन ही स्क्रीन जनरेशन आहे, त्यामुळे मोबाईल अथवा लॅपटॉपवर लिहिलेलं त्यांच्या जास्त चांगलं लक्षात राहतं. टेक्नॉलॉजीचा असा स्मार्ट वापर तुम्ही करू शकता.

दुपारचे झोपू नका. खूप थकला असाल तर जास्तीत जास्त २० मिनिटांची विश्रांती म्हणजे पॉवरनॅप घेऊ शकता.

शांत चित्ताने अभ्यास करता यावा, म्हणूनच छंद जोपासा. कारण त्यामुळे तुमच्या मनावरचा ताण निघून जाईल.

रोज ८ तासांची झोप हवीच. रात्री डोळे ताणून जागे राहण्यापेक्षा पहाटे उठून अभ्यास करणं जास्त चांगलं. तब्येतीला जपा.

गेल्या वर्षी यशस्वीरित्या दहावी उत्तीर्ण झालेल्या तनिज फातिमा, सायली माळवी, चिन्मय म्हात्रे, सुरज गायकवाड, आदित्य आपटे, वैष्णवी परब, सिमरन भाटीया, निखिल अभ्यंकर, ओंकार परते, नागेश सामणे, आरुष भावे या विद्यार्थ्यांनीही आपले अनुभव इथे कथन केले. या विद्यार्थ्यांसोबत झालेली प्रश्नोत्तरं ...

दहावीच्या अभ्यासाची सुरुवात कधी केलीत?

दहावीचे वर्ष सुरु होण्याच्या आधी म्हणजे नववीचा रिझल्ट लागल्यानंतरच अगदी एप्रिल महिन्यापासून त्यांनी नियमित अभ्यास सुरु केला.

प्रत्येक विषयासाठी किती वेळ दिला होता?

आपल्याला झेपेल त्याप्रमाणे. किमान तीन तास. काहीवेळा ४ तास तर परीक्षा जवळ आल्यावर काहींनी ५-६ तास अभ्यास केला होता.

निबंध, पत्रलेखन याचा सराव कसा केला?

अवांतर वाचन हाच सराव आहे. या वाचनाने आपली शब्दसंपत्ती वाढते. विविध कल्पना सुचतात आणि निबंध ‌किंवा पत्र लिहीणं सोपं जातं.

हॉट्स प्रश्नांची तयारी कशी केली?

हे प्रश्न म्हणजे, अत्यंत कठीण वगैरे असं काही नाही. आपल्या पाठ्यपुस्तकातीलच काही प्रश्न थोडेसे उलट-सुलट करून, फिरवून विचारले जातात. संकल्पना पक्क्या असल्या की ते सोडवणं सोपं जातं. त्याची उत्तरं तार्किक द्यावी लागतात.

अभ्यासाचं वेळापत्रक तयार केलं होतं का?

हो. वेळापत्रक तर हवंच. रोजच्या वेळापत्रकापेक्षा एकेका आठवड्याचं वेळापत्रक बनवण्याकडे भर द्या. शिवाय वेळापत्रक पाळणं, हेसुद्धा जास्त गरजेचं आहे. अभ्यासाबरोबरच आरोग्याचं वेळापत्रकही गरजेचं आहेच. वेळच्यावेळी जेवण आणि झोप हवीच.

MCQ's चा सराव कसा केला?

त्यासाठी भरपूर सराव आवश्यक असतो. ते केलंच. शिवाय बरीच पुस्तकंही वाचली. वेळोवेळी शिक्षकांचं मार्गदर्शनही महत्त्वाचं होतंच.

वर्षभरात किती सराव पेपर सोडवले?

प्रत्येक विषयाचे किमान ५ सेट सरावपेपर सोडवले आहेत.

परीक्षेच्या वेळी ताण येऊ नये म्हणून काय केलं?

परीक्षेचा ताण घालवायचा उत्तम मार्ग म्हणजे, अभ्यासाव्यतिरीक्त आवडीचं दुसरं काही करणं. आवडता छंद जोपासणं. यात वेळ फुकट जात नाही. तर आपला मेंदू ताजातवाना होतो.

No comments:

Post a Comment