आरोग्यविषयक लेख
डॉ. जगन्नाथ दीक्षित आज जे सांगत आहेत तो सिद्धांत भारतात प्रथम १९९७ साली डॉ. श्रीकांत जिचकार यांनी मांडला होता. या विचाराच्या प्रसारार्थ त्यांनी 'नागपूर फिटनेस मुव्हमेंट' आणि 'पुणे फिटनेस मुव्हमेंट' सुरु केल्या होत्या. त्याकाळी आजच्या सारख्या सोशल मिडीयाच्या सुविधा नसल्याने आणि दुर्दैवाने डॉ. जिचकार यांचे अपघाती निधन झाल्याने ही चळवळ तिथेच थांबली. स्वतःचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करून थकलेल्या डॉ. दीक्षित यांनी डॉ. जिचकार पद्धतीने वजन कमी केले, त्यावर संधोधन केले आणि ही चळवळ नव्याने पुढे नेली. डॉ. जिचकार स्वतः MBBS, MD, IAS, IPS होते. भारतात सर्वाधिक पदव्या धारण करण्याचा विक्रम आजही त्यांच्या नावे आहे. डॉ. जिचकार आणि डॉ. दीक्षित ही दिग्गज मंडळी जे मांडतात ते शास्त्रीय आहे हे पटल्याने उद्यापासून आपणही ही आहार योजना करायचीच हे ठरवले. (डॉ. जिचकार यांचे जे व्याख्यान ऐकून डॉ. दीक्षित प्रेरित झाले ते व्याख्यानही युट्युब वर इथे आहे. https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGUwW4
९ फेब्रुवारी २०१८ पासून मी डॉ. दीक्षित यांची आहारयोजना सुरु केली. तीन महिन्यानंतर म्हणजे ९ मे २०१८ रोजी वजन केले तेंव्हा ते ९० वरून ८० किलो झाले होते आता ते ७८ किलो आहे. माझे टार्गेट ७५ किलो आहे. पुढच्या दीड दोन महिन्यात ते सहज गाठले जाईल. विशेष म्हणजे हे सगळे करण्यासाठी एकही पैसा खर्च केला नाही की कुणीही कन्सल्टंट नाही. वेटलॉस केल्याच्या विपरीत खुणा शरीरावर नाहीत की त्यासाठी आहारात काही बदल केला नाही. जे पूर्वी खायचो तेच, तेवढेच फक्त खाण्याचा क्रम, पद्धत बदलून हे सहज साध्य झाले.
आता डॉ. जगन्नाथ दीक्षित काय म्हणतात ते पाहू.
१) तेल-तूप, साखर प्रमाणात खाऊनही वजन का वाढते? मधुमेह का होते?
वजन वाढणे आणि मधुमेह या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्हीमध्ये 'कार्बो-इंस्युलीन कनेक्शन' हे कारण आहे. हे वाचून थोडे अवजड वाटते पण व्यवहारात ते कसे काम करते ते पाहू.
वाढलेले वजन (स्थूलत्व) म्हणजे शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी. ही चरबी बाहेरून कुठून येत नाही तर आपण खाल्लेल्या अन्नातून तयार होते. आपण कितीही वेगवेगळ्या प्रकारचे, चवींचे पदार्थ खाल्ले तरीही त्यांचे रुपांतर पचनानंतर फक्त तीन पदार्थांमध्ये होते..
१: पिष्टमय पदार्थ अर्थात ज्वारी, गहू, तांदूळ, डाळी पासून ब्लड ग्लुकोज (रक्त शर्करा) तयार होते. ही ग्लुकोज शरीर चालवण्यासाठी उर्जा म्हणून वापरली जाते. (सर्व डाळीं जवळ जवळ ७० ते ८५ टक्के पिष्टमय असतात, उरलेले प्रोटीन व इतर घटक असतात)
२: प्रथिनांपासून अमायनो आम्ले तयार होतात. स्नायूंची झीज भरून काढणे आणि नवीन स्नायू तयार करण्यासाठी अमायनो आम्ले वापरली जातात.
३: स्निग्ध पदार्थांपासून फॅटी अॅसिडस् तयार केले जातात. त्याचं वापर वंगण आणि पेशींची आवरणे तयार करणे, हार्मोन्स तयार करणे या साठी केला जातो. खाल्लेल्या कोणत्याही शाकाहारी पदार्थाचे अगदी तेलाचे रुपांतर थेट कोलेस्ट्रॉलमध्ये होत नाही.
भारतीय, विशेषतः शाकाहारी लोकांच्या आहारात पिष्टमय पदार्थांचे प्रमाण खूप मोठे आहे. म्हणजेच भरपूर पिष्टमय पदार्थ खाऊन आपण खूप जास्त प्रमाणात रक्तशर्करा (blood sugar) तयार करतो. रक्तशर्करा हा शरीरासाठी उर्जेचा प्रमुख स्त्रोत आहे. रक्तामधील ही साखर प्रत्येक पेशीला इंधन म्हणून देण्याचे काम इन्स्युलीनच्या मदतीने केले जाते. शरीरात चोवीस तास सुरु असलेल्या श्वसन, रक्ताभिसरण, पचन, मेंदूचे कार्य यासारख्या अचल, अनैच्छिक क्रियांसाठी आणि इतर चल स्वरूपातील क्रियांसाठी (चालणे, फिरणे, घरकाम, व्यायाम इत्यादी) रक्तशर्करा इंधन म्हणून वापरली जाते. भारतीय लोकांच्या आहारात पिष्टमय पदार्थांचे प्रमाण खूप असल्याने आपण खूप मोठ्या प्रमाणात रक्तातील साखर तयार करतो. बैठी जीवन शैली, व्यायामाचा अभाव असल्याने रक्तातील ही सगळी साखर वापरली जात नाही. वापरून शिल्लक असलेली साखर रक्तातून त्वरित काढून टाकणे गरजेचे असते. सामान्यपणे रक्तामध्ये साखर ९० ते १०० mg/dl (मिली ग्राम प्रति डेसीलिटर) असणे अपेक्षित आहे. साखरेचे प्रमाण त्यापेक्षा जास्त असेल (हाय ब्लड शुगर) किंवा कमी असेल (लो ब्लड शुगर) तरीही ते धोकादायक असते. म्हणून इन्स्युलीन रक्तातील अतिरिक्त साखर काढून घेतो आणि त्याचे प्रथम ग्लायाकोजेन मध्ये आणि त्यानंतर चरबी मध्ये रुपांतर करून शरीरात साठवून ठेवतो. आपण पुन्हा काही तरी खातो परत त्याची रक्त शर्करा बनते, न वापरलेली शर्करा पुन्हा चरबीच्या रुपात साठवून ठेवली जाते. अशा प्रकारे आपण दिसामाजी चंद्राच्या कले प्रमाणे वाढत-वाढत जातो, शेवटी लवकरच पौर्णिमा उजाडते, पोटावर गरगरीत चंद्र दिसू लागतो आणि आपल्याला समजते की आपण जाड झालो आहोत.
या सगळ्या प्रक्रियेमध्ये इन्स्युलीन खूप महत्वाची भूमिका बजावत असतो. इन्स्युलीन हा सेव्हिंग हार्मोन आहे. पेशींना साखरेच्या रुपात उर्जा पोचवणे आणि शिल्लक उर्जा चरबीच्या रुपात साठवून ठेवणे हे त्याचे मुख्य काम.
दिवसातून पाच-सहा वेळा थोडे थोडे खाणे, किमान दोन वेळा चहा घेणे या प्रकारातून मी कसा जाड होत गेलो हे आता मला समजले होते.
आता मधुमेह होण्यामागे परत इन्स्युलीन कसा कारणीभूत आहे ते पाहू.
(पुढचे सर्व वर्णन टाईप-2 मधुमेहासाठी लागू आहे. टाईप-2 मधुमेह हा जीवनशैलीमधून होणारा आजार आहे. बालपणापासून ठणठणीत असलेल्या माणसाला तरुणपणी, उतारवयात केंव्हातरी कळते की आपल्याला मधुमेह झाला आहे, हा टाईप-2 मधुमेह. या उलट बालपणापासून असलेला मधुमेह म्हणजे टाईप-1. पुढील वर्णन टाईप-2 माधुमेहीसाठीचे आहे.)
इन्स्युलीन दोन प्रकारे शरीरा मध्ये स्त्रवते. पहिला आहे बेसलाईन सिक्रिशन. हा स्त्राव चोवीस तास सूक्ष्म स्वरुपात सुरु असतो. जिवंत राहण्यासाठी हा स्त्राव आवश्यक असतो. तो थांबवणे, कमी करणे, वाढवणे आपल्या हातात नाही.
इन्स्युलीन स्त्रवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे काहीही खाल्ल्यानंतर स्त्रवणारे इन्स्युलीन. आपण काही खाल्ले की त्याची पचनानंतर साखर होणार हे निश्चित. या साखरेचे व्यवस्थापन करणे हे इन्स्युलीनचे काम. म्हणजेच इन्स्युलीनचा हा स्त्राव आपल्या खाण्याची स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. आपण जितक्या अधिक वेळा खाऊ तितक्या अधिक वेळा इन्स्युलीन स्त्रवणार हे नक्की. इन्स्युलीनचा स्त्राव आपण किती खातो, जास्त की कमी यावर अवलंबून नसून 'किती वेळा खातो' यावर अवलंबून आहे. एक बिस्कीट, अर्धा कप चहा किंवा फळे घेताना चव पाहण्यासाठी खाल्लेला आंब्याचा तुकडा किंवा दोन द्राक्षे यामुळे तेवढेच इन्स्युलीन पाझरते जेवढे आम्रखंड, आमरस पुरी किंवा पुरणपोळीचे आकंठ जेवण केल्यानंतर स्त्रवते. ही व्यक्ती काहीतरी खाते आहे हा संदेश मेंदूकडे गेला की मेंदू इन्स्युलीन रक्तामध्ये सोडतो. तुम्ही दोन घोट चहा पिणार आहात, एकच बिस्कीट खाणार आहात की आडवा हात मारून पुख्खा झोडणार आहात हे त्या बिचाऱ्या मेंदूला माहित नसते त्यामुळे तो त्याचे इन्स्युलीन पाझरण्याचे घाऊक काम करून मोकळा होतो.
इन्स्युलीन एकदा स्त्रवले आणि पंचावन्न मिनिटांनंतरही खाणे सुरूच असेल तर पुन्हा स्त्रवते. म्हणजेच इन्स्युलीन स्त्रवण्याची सायकल पंचावन्न मिनिटांची आहे.
सकाळी उठल्यापासून पहिला चहा ते रात्री झोपताना घेतलेले कपभर कोमट दुध या मध्ये आपण किती वेळा काय काय खातो हे प्रत्येकाने पाहावे म्हणजे कळेल की आपल्या रक्तामध्ये किती वेळा इन्स्युलीन पाझरते.
न्याहारी, चहा, जेवण आणि ज्याला रूढ अर्थाने आपण आहार म्हणत नाही अशा वारंवार किरकोळ खाण्यामुळे सुद्धा तेवढेच इन्स्युलीन वारंवार पाझरते. मी माझा आढावा घेतला तेंव्हा लक्षात आले की दिवसातून आपण किमान आठ ते दहा वेळा इन्स्युलीन पाझरण्याची व्यवस्था करत होतो.
इन्स्युलीनचे रक्तामधील वाढलेले प्रमाण शरीरातील कोणत्याच यंत्रणेकडून स्वीकारले जात नाही. ते त्यांना आवडत नाही. वाढलेल्या इन्स्युलीनमुळे शरीरातील यंत्रणाच्या कामांमध्ये अडथळे येतात. इन्स्युलीन आणि शरीरातील यंत्रणा यांच्या मध्ये धुसफूस सुरु होते. इन्स्युलीनच्या या आक्रमणाचा निषेध म्हणून या यंत्रणा असहकार आंदोलन पुकारतात. त्या स्वतःचेही कार्य व्यवस्थित पार पाडत नाहीत आणि इन्स्युलीनच्या कामातही अडथळे निर्माण करतात. या अवस्थेला वैद्यकीय परिभाषेत 'इन्स्युलीन रेझीस्टेन्स' म्हणतात. थोडक्यात इन्स्युलीनला शरीरातील असंतोषाचा जनक म्हणता येईल. इकडे आपण मात्र वारंवार खाण्याचे काम आपण इमान-इतबारे पार पाडत असतोच त्यामुळे इन्स्युलीनची भर वरचेवर पडतच जाते. यामुळे स्थिती वरचेवर बिघडत जाते. शरीराने इन्स्युलीनचा प्रतिकार सुरु केलेला असल्याने पेशींमध्ये रक्तशर्करा जात नाही, वारंवार खाल्ल्यामुळे इन्स्युलीन जोमात पाझरत असते पण इन्स्युलीनचे काम शरीराने ठप्प केल्यामुळे रक्तामध्ये साखर साचायला लागते. यालाच आपण मधुमेह झाला असे म्हणतो. साचलेली साखर इन्स्युलीन जमेल तशी चरबीच्या रुपात साठवून ठेवायला लागतो. शरीरात चरबीच्या रूपाने उर्जा साठवली जाते पण रक्तामधील साखर पेशींना वापरता येत नसल्याने पेशींचे कुपोषण सुरु होते. त्यामुळे मधुमेहामध्ये थकवा यायला लागतो.
मधुमेहाच्या शेवटच्या अवस्थेत रुग्णाला बाहेरून इन्स्युलीन दिले जाते यामागे शरीराने निर्माण केलेली रेझीस्टेन्सची फळी बाहेरून दिलेल्या इन्स्युलीनने मोडून टाकावी आणि काही प्रमाणात साखर पेशींमध्ये घुसवता यावी हा उद्देश असतो.. पण शरीरही ठकास महाठक या न्यायाने आपला अवरोध (रेझीस्टेन्स) आणखी वाढवते, त्याचा प्रतिकार करण्यासाठी इन्स्युलीनचा डोस आणखी वाढवावा लागतो. हे दुष्टचक्र असेच चक्रवाढ पद्धतीने सुरु राहते, रुग्णाची अवस्था अगदी केविलवाणी होईन जाते. शरीरांतर्गत आणि बाहेरून दिलेल्या इन्स्युलीनमुळे शरीरात इन्स्युलीनचे प्रमाण प्रचंड वाढते आणि इतर गुंतागुंत वाढत जाते.
शरीरातील इन्स्युलीनचे प्रमाण कमी झाल्याने मधुमेह होतो असे मला आजवर वाटत होते मात्र त्याचे कारण नेमके उलटे आहे, इन्स्युलीनचे प्रमाण बेसुमार वाढल्यामुळे मधुमेह होतो हे या व्याख्यानातून समजले.
वाढलेले इन्स्युलीन केवळ मधुमेहाला कारणीभूतच ठरत नाही तर रक्तामधील कोलेस्ट्रॉल वाढणे, हृदयविकार, हार्मोनल असंतुलन, कर्करोग या आजारांसाठी ट्रिगर म्हणून काम करते.
स्थूलत्व आणि मधुमेह यात इन्स्युलीनचा अदृश्य हात आणि वारंवार खाणे थेट कारणीभूत आहे हे स्पष्ट झाले. हे चक्र उलटे फिरवायचे असेल म्हणजेच स्थूलत्व आणि मधुमेह नियंत्रण करायचे असेल तर इन्स्युलीनचा पाझर नियंत्रित करणे हा एकमेव उपाय आहे.
इन्स्युलीनचा पाझर आपल्या खाण्याला शरीराकडून दिलेली स्वाभाविक प्रतिक्रिया असते. त्यामुळे इन्स्युलीनचा वारंवार होणारा पाझर नियंत्रित करायचा असेल तर थोडे थोडे अनेकदा खाण्यापेक्षा दिवसभरासाठी लागणारा आहार दोन वेळा विभागून घेणे म्हणजेच दिवसातून दोन वेळाच जेवणे, या जेवणांमध्येच हवी असतील तर फळे, दुध घेणे, हे जेवण पंचावन्न मिनिटाच्या आत संपवणे. या दोन जेवणांच्या मध्ये snacks, साखरेचा चहा, फळे, सुकामेवा, दुध हे काहीही न घेणे हीच डॉ. दीक्षितांची आहारयोजना आहे. ही आहार योजना आणि ४५ मिनिटे चालण्याचा व्यायाम हाच डॉ. दीक्षित वेटलॉस प्लान आहे.
दोन वेळा खाऊन वजन कसे कमी होईल?
शास्त्रीय पद्धतीने वजन कमी करणे म्हणजे अतिरिक्त चरबी जाळणे. व्यायाम किंवा कोणत्याही नैसर्गिक पद्धतीने शरीरातील चरबी जाळायची असेल तर शरीरातील इन्स्युलीनचे प्रमाण सर्वसामान्य पातळीला असणे आवश्यक आहे. इन्स्युलीन पातळी अधिक असेल आणि कितीही व्यायाम केला तरी सुरुवातीला रक्तातील साखरेचे ज्वलन होईल, ती संपल्यानंतर यकृतामधील ग्लायकोजेन (साखरेचे संयुग) उर्जेसाठी वापरले जाईल. तासभर जीव खाऊन व्यायाम केला तरीही शरीरात वर-वर उपलब्ध असलेली साखरच इंधन म्हणून वापरली जाईल. चरबीला हातच लागणार नाही. त्याच वेळी शरीरात इन्स्युलीनचे प्रमाण अधिक असेल तर व्यायामानंतर सपाटून भूक लागते. कारण रक्तामधील साखर आणि यकृतामधील ग्लायाकोजेन संपल्यामुळे शरीरात उर्जेचा खडखडाट झालेला असतो. ही तुट भरून काढण्यासाठी इन्स्युलीन उर्जेसाठी अन्नाची मागणी करतो त्यामुळे व्यायामानंतर आपल्याला सपाटून भूक लागते. खाल्ल्यानंतर परत रक्तात साखर निर्माण होते, भरपूर खाल्लेले असल्याने उरलेली साखर परत चरबीच्या रूपाने साठवली जाते. म्हणजे शेवटी शरीरातील चरबी काही कमी होत नाही.
आता या पद्धतीमधील महत्वाचा भाग इथे सुरु होतो आहे. इन्स्युलीन हे सेव्हिंग हार्मोन आहे, चरबी साठवून ठेवणे तिची राखण करणे हे त्याचे काम आहे. त्याच्या उपस्थितीमध्ये इंधन म्हणून चरबी कधीही खर्च केली जाऊ शकत नाही. चरबीचे ज्वलन करण्यासाठी इन्स्युलीनच्या विरोधात काम करणारा हार्मोन शरीरामध्ये पाझरावा लागतो त्याचे नाव आहे 'ग्लुकॅगॉन' पण गम्मत अशी आहे की इन्स्युलीन आणि ग्लुकॅगॉन हे दोघेही एकमेकाच्या विरोधात काम करणारे असल्याने एकाच वेळी हे दोघे शरीरात कार्यरत असू शकत नाहीत. ग्लुकॅगॉनचा पाझर शरीरामध्ये शरीरातील इन्स्युलिनची नीचांकी पातळी (बेसलाईन) असेल तेंव्हाच होतो.
इन्स्युलीनचा पाझर काहीतरी खाल्ल्यामुळे होतो त्यामुळे आपण आहार घेण्याच्या वेळा नियंत्रित केल्या (डॉ. दीक्षितांच्या योजनेप्रमाणे चोवीस तासात दोन वेळा) तर चोवीस तासात दोनच वेळा इन्स्युलीनचा पाझर होईल. अन्न पचन होऊन साखरेचे व्यवस्थापन झाले की इंस्युलीनला काही काम उरत नाही. यामुळे निसर्गन्यायाने इन्स्युलीनची पातळी हळू हळू कमी होऊन ती बेसलाईनला येईल. पेशींना इन्स्युलीन मार्फत दिलेली साखर काम करून खर्चून संपून गेल्यानंतर शरीरात उर्जेचा तुटवडा जाणवू लागेल. तरीही आपण काही खाल्ले नसल्याने आणि त्यामुळे इन्स्युलीन पाझरत नसल्याने शरीरात ग्लुकॅगॉनचा प्रभाव वाढत जाईल. ग्लुकॅगॉन इन्स्युलीनच्या विरुद्ध काम करतो. ग्लुकॅगॉन शरीरातील साठलेल्या चरबीला परत साखरेमध्ये रुपांतरीत करतो आणि ही साखर रक्तामध्ये सोडून देतो. साखरेतून शरीराला आवश्यक उर्जा मिळते आणि शरीराचे कार्य सुरळीत सुरु राहते. म्हणजेच अन्न खाऊन पचन झाल्यानंतर जी स्थिती शरीरामध्ये निर्माण होते तीच स्थिती ग्लुकॅगॉन च्या प्रभावामुळे न खाता निर्माण होते. ग्लुकॅगॉन चरबीचे रुपांतर साखरेमध्ये करून रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवतो, शरीराला आवश्यक असलेली उर्जा या साखरेतून मिळते. त्यामुळे खाल्ले नाही तरी थकवा येत नाही, चक्कर येत नाही, चिडचिड होत नाही. शरीरातील यंत्रणा या उर्जेवर सुरळीतपणे काम करू लागतात.
शरीराची उर्जेची गरज भागल्यामुळे पूर्वीसारखी अवेळी भूक लागणार नाही कारण शरीराला उर्जेसाठी अन्नावर अवलंबून राहावे लागत नाही. उर्जेसाठी चरबी वापरली गेल्यामुळे चरबीचा साठा कमी-कमी होत जातो आणि नैसर्गिक पद्धतीने वेटलॉस होतो.
मी दुपारी बारा वाजता जेवण करतो त्या नंतर रात्री आठ वाजता. (आठ तासांची इटिंग विंडो) रात्री आठ ते दुसऱ्या दिवशी बारा वाजेपर्यंत काहीही घेत नाही. (सोळा तासांची फास्टिंग विंडो) रात्रीचे जेवण पचून त्याची साखर सकाळी सात वाजेपर्यंत संपून गेलेली असते. मी सकाळी आठ ते नऊ भरभर चालण्याचा व्यायाम करतो. या व्यायामासाठी आणि सात ते बारा वाजेपर्यंत शरीर चालवण्यासाठी लागणारी उर्जा ग्लुकॅगॉन चरबीमधून मिळवतो. म्हणजेच चरबीचे ज्वलन होते. शरीरासाठी लागणाऱ्या उर्जेची सोय झालेली असल्याने शरीर अन्नाची मागणी करत नाही त्यामुळे जीवघेणी भूक लागत नाही.
दोनच वेळा खाल्ल्यामुळे, पोट रिकामे राहिल्यामुळे पित्तविकार होत नाही का?
एरव्ही वारंवार खाल्ल्याने जठरात कायम पाचक आम्ले पाझरत असतात. वारंवार खायची सवय असेल आणि एखादे वेळी पोट रिकामे राहिले तर जठरात शिल्लक असलेले आम्ल हे पित्तविकारास कारणीभूत होते. दोनच वेळा खाल्ल्यामुळे अतिरिक्त पाचक आम्ले पाझरत नाहीत त्यामुळे आम्लपित्त होत नाही.
भूक सहन होईल का?
दोनच वेळा जेवायचे आणि दोन जेवणांमध्ये काहीही घ्यायचे नाही हे ऐकून मी स्वतः हबकलो होतो. आपल्याला हे जमणार नाही असे वाटून मागे फिरलो होतो. मात्र वजन कमी करायचा निर्धार असल्याने एक आठवडा करून पाहू, नाही जमले तर सोडून देऊ या विचाराने मी ही आहार योजना सुरु केली. इन्स्युलीन पातळी सामान्य होईपर्यंत सुरुवातीला प्रचंड भूक लागायची. अशा वेळी घरी केलेले पातळ ताक, टोमॅटोच्या एक दोन फोडी, ग्रीन किंवा black टी असे पदार्थ घेण्यास डॉ. दिक्षितानी परवानगी दिलेली असल्याने फारसा त्रास झाला नाही. पाच-सहा दिवसत नवीन पद्धतीला शरीर सरावले (इन्स्युलीन पातळी कमी झाली आणि ग्लुकॅगॉनचे कार्य सुरु झाले) त्यानंतर फूड क्रेविंग येणे बंद झाले. मी आता दुपारी बारा वाजता आणि रात्री आठ वाजता जेवतो. सकाळी चहा घेत नाही, पाच वाजता black tea/ without sugar घेतो.
मधुमेह नियंत्रण कसे होईल?
दोन वेळा जेवल्यामुळे शरीरातील इन्स्युलीन रेझीस्टेन्स कमी-कमी होत जातो, इन्स्युलीन पातळी कमी झाल्यामुळे शरीर आणि इन्स्युलीन मधील वाद संपुष्टात यायला लागतो. शरीर इन्स्युलीनला प्रतिसाद द्यायला लागते. रक्तातील साखरेचे व्यवस्थापन योग्य रीतीने सुरु झाल्यामुळे मधुमेह प्रतिबंध होतो, मधुमेही हळूहळू रोगमुक्त होतो. मधुमेहाची औषधे पूर्ण बंद झाल्याची शेकडो उदाहरणे डॉ. दीक्षित यांच्याकडे आहेत. त्यांच्या फेसबुक पेजवर लाभार्थींची नावे, त्यांचे अनुभव मोबाईल नंबर सकट दिले आहेत https://www.facebook.com/weightlosseffortlessly/
ज्यांना मधुमेह आहे अशांनी HbA1c आणि fasting insuline या दोन तपासण्या करून त्याचे अहवाल डॉ. दीक्षित यांना पाठवावेत. त्यांच्या सल्ल्यानेच पुढील आहार योजना सुरु करावी. परस्पर आहारयोजना सुरु करू नये.
डॉ. दीक्षित यांची फीस किती? ते कुठे भेटतील?
डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी "स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त भारत" हे एक जनअभियान सुरु केले आहे. त्यांचा कुठेही दवाखाना नाही किंवा कोणत्याही रुग्णालयासोबत ते जोडलेले नाहीत. ते whatsapp च्या माधमातून मोफत सल्ला देतात. youtube वर त्यांची व्याख्याने आहेत, ती पाहून, व्यवस्थित माहिती घेऊन आपण स्वतःच आपले आरोग्य सांभाळायचे आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद तसेच इतर ठिकाणी सुद्धा अभियानातील साठ कार्यकर्ते मार्गदर्शन आणि मदत करतात. पुण्यात डॉ. वेदा नलावडे, डॉ. संगीता पंडित, दीपक कुलकर्णी हे मदतगटातील कार्यकर्ते whatsapp च्या माध्यमातून मार्गदर्शन करतात. डॉ. दीक्षित एकूण १२७ whatsapp ग्रुप्स चे संचालन करतात त्यातून २७ देशांमधील हजारो लोकांना स्थूलत्व आणि मधुमेह नियंत्रणासाठी मार्गदर्शन करतात. या संपूर्ण अभियानामध्ये एकही रुपयाची देव-घेव होत नाही.
आमच्या घरातील, नात्यातील काही यशोगाथा:
मी स्वतः चार महिन्यात दहापेक्षा अधिक किलो चरबी घटवली आहे. उत्साह, स्फूर्ती वाढली आहे. वजन कमी झाल्यामुळे गुडघेदुखी गायब झाली आहे. पोट, चेहरा, मांड्या, या भागावरील चरबी झडून गेली आहे. तरीही गाल खप्पड झाले नाहीत. ग्लुकॅगॉन चा प्रभाव वाढल्यामुळे शरीरात anti ageing/ growth हार्मोन्सचेही प्रमाण वाढते. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. त्यामुळे वय पाच वर्षे मागे जाते. माझा अनुभव पाहून पत्नी वैष्णवीने Vaishnavi Kulkarni चार किलो वजन दोन महिन्यात कमी केले. तिने तिचे आदर्श वजन आता गाठले आहे.
वैष्णवीची बहीण माधुरी देशपांडे आणि त्यांचे यजमान यांनीही एक महिन्यात लक्षणीय वजन कमी केले आहे. त्यांचे नक्की आकडे या क्षणी उपलब्ध नसल्याने इथे देऊ शकत नाही.
माझा मेहुणा श्रीकांत Shrikant Nitalikar गेल्या सात वर्षांपासून मधुमेहासाठी औषधे घेत आहे. त्याची सरासरी साखर २०० असायची ती आता १२० च्या आसपास असते. औषधांचा डोस अर्ध्याने कमी झाला आहे.
श्रीकांतची पत्नी प्रज्ञा Pradnya Nitalikar गेल्या काही महिन्यापासून मधुमेही होती. तिची सरासरी रक्त शर्करा १५० असायची ती आता ९५ आहे. दोन महिन्यात ती मधुमेह मुक्त झाली आहे. मधुमेहावरील कोणतेही औषध ती सध्या घेत नाही. प्रज्ञाला थायरोइडचा त्रास गेल्या चार वर्षापासून होता त्याचे औषधही निम्म्यावर आले आहे. (श्रीकांत आणि प्रज्ञा यांची मधुमेहावरची, थायरोइडची औषधे त्यांच्या डॉक्टरांनी कमी केली आहेत. डॉ. दिक्षितानी नाही. आपापल्या स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरु ठेवण्यासाठी डॉ. दीक्षित आग्रही असतात)
श्रीकांत आणि प्रज्ञा यांनी पनवेल मदतगटाची स्थापना केली असून १० जून रोजी पनवेल मदतगटाने पनवेल मध्ये डॉ. दीक्षितांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला.
माझा भाऊ सुहास Suhas Kulkarni याने दोन महिन्यात पाच किलो वजन घटविले. सुहास सतत देश विदेशात दौऱ्यावर असतो. तरीही त्याला जमेल तसे त्याने आहार योजनेचे पालन करून हे यश मिळाले आहे.
वेटलॉस प्रोग्राम किती दिवस सुरु ठेवायचा?
हा काही दिवसांचा प्रोग्राम नसून ही एक जीवनशैली आहे. नियमितता आणि मिताहार ही निरोगी दीर्घायुष्याची किल्ली आहे. आयुर्वेद, अध्यात्मशास्त्र, आधुनिक संशोधन सगळे याचा पुरस्कार करतात त्यामुळे काही दिवसानंतर आहार योजना इतकी अंगवळणी पडते, त्याचे लाभ स्पष्ट दिसायला लागतात की जुनी जीवनशैली शत्रू वाटायला लागेल.
डॉ. दीक्षित जे सांगतात ते भारताबाहेरील अनेक तज्ञ गेली काही वर्षे सांगत आहेत. डॉ. जेसन फंग या कॅनडा मधील संशोधकाच्या मते मधुमेहावर आज केले जाणारे उपचार हे फक्त मधुमेहाच्या रक्त साखर वाढण्याच्या लक्षणावर केले जातात. त्यातून फक्त साखर नियंत्रणात ठेवणे हाच एक उद्देश्य समोर ठेवला जातो. त्यामुळे मधुमेह कधीही बरा होत नाही, त्यातील गुंतागुंत आणि औषधोपचार वाढत जातात. मधुमेहाचे खरे कारण इन्स्युलीनचा अवरोध हे आहे आणि जीवनशैलीतील सुधारणांमुळे त्यावर मात करता येते हे डॉक्टर्स रुग्णांना सांगताच नाहीत. त्यामुळे मला मधुमेह का झाला हे बहुसंख्य रुग्णांना माहीतच नसते. पद्मश्री डॉ. बी. एम. हेगडे यांच्या मते या सर्वांच्या मागे आरोग्यसेवा उद्योग आणि औषधनिर्माण उद्योग यांचे संगनमत आहे. डॉ. एरिक बर्ग हे हॉवर्ड विद्यापीठातील तज्ञ हेच मांडतात. चेन्नई मध्ये कित्येक वर्षे रूढ पद्धतीने मधुमेहाचा उपचार करणारे डॉ. विजयराघवन आता नियंत्रित आहारयोजनेतून मधुमेह मुक्तीचे उपचार करीत आहेत.
ज्यांना शास्त्रीय पद्धतीने वजन कमी करायचे आहे, मधुमेह प्रतिबंध करायचा आहे त्या सर्वांनी कृपया एकदा डॉ. दीक्षितांचे व्याख्यान जरूर ऐकावे, फेसबुक पेजवर असलेल्या यशोगाथा वाचाव्यात. काही शंका असेल तर लाभार्थींना फोन करून खात्री करावी आणि मगच आपले मत तयार करावे ही विनंती.
डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची लिंक खाली देत आहे. त्या व्याख्यानातच संपर्कासाठी मोबाईल नंबर दिले आहेत.
https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ
No comments:
Post a Comment