K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday 15 May 2021

 🛑🌾🍪खापरावरची पुरणपोळी : एक खानदेशी संस्कार 🍪🛑🌾

      पोळी म्हटली की चपाती, पोळी, रोट, घडी अशी वेगवेगळी नावे आठवतात. खानदेशात पोळी म्हटली की जिभेला पाणी सुटते. सुवासिक, सुरुचीपूर्ण, सुग्रास भोजनाचे ताट डोळ्यांसमोर दिसू लागते आणि तोंडाला सुटलेल्या पाण्यात रसना मनसोक्त पोहून लागते. पुरणपोळी सोबत झणझणीत आमटीचा मुरका मारावा तसा तोंडातल्या लाळेला आवर घालावा लागतो. 'ब्रम्हानंदी टाळी लागणे 'या वाक्प्रचाराचा अर्थ शोधायचा असेल तर खापरावरच्या पुरणपोळीचा आमरसा सोबत जेवणाचा एक घास चाखून बघावा. द्वैत आणि अद्वैत हा भावच पार विरघळून जातो. आत्मा परमात्म्याचे मिलन व्हावे, असा तादात्म्यभाव निर्माण होतो.

           संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने पुरणपोळ्या बनवल्या जातात परंतु खानदेशातील खापरावरच्या पुरणपोळीचे वैशिष्ट्य काही औरच आहे. खानदेशात त्याला ' मांडा ' असे म्हटले जाते. श्रावण महिन्यातील बैलपोळा, गौरी-गणपती, लहान कानबाई, पितृश्राद्ध, नवरात्र, दसरा, दिवाळी, संक्रांत, होळी, गुढीपाडवा, मोठी कानबाई, अक्षय तृतीया, वटपौर्णिमा या प्रमुख सणांच्या व्यतिरिक्त वेळोवेळी येणारे पाहुणेरावळे, त्यांना होणारे पाहुणचार, लग्न समारंभ, कुठलाही सण समारंभ असो, खानदेशी लोकांचे पुरणपोळी शिवाय पानच हलत नाही.

           काही बहाद्दर तर इतके खवय्ये असतात की त्यांच्यासमोर चिकन मटणाचे ताट दिले तरी त्याला बाजूला सारतील अन पुरणपोळी वर तुटून पडतील अशी ही सर्वांना वेड लावणारी पुरणपोळी !

         जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा, एरंडोल ,धरणगाव पासून संपूर्ण धुळे जिल्हा व नाशिक जिल्ह्याचा बहुतांशी भाग खापर पुरणपोळी साठी प्रसिद्ध आहे. या अहिराणी भाषिक पट्ट्यात पुरणपोळी जीव की प्राण आहे. आज-काल महाराष्ट्र व बाहेरच्या अनेक राज्यातील हॉटेल व्यवसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पुरणपोळी विक्री सुरू केली आहे पण खानदेशातील खापर पुरणपोळीची चवच वेगळी आहे.

          सडा रांगोळी पासून तर पुरणपोळी पर्यंतचा अभिजात संस्कार हा मुलींना बालपणीच दिला जातो. मुलींनी स्वयंपाकात चतुर असलेच पाहिजे हा खानदेशात आग्रह आजही कायम आहे. त्या अर्थाची एक म्हण पण आमच्याकडे वापरली जाते '  बाई देखो व्हट मां अन पोयी देखो काठ मां ' अर्थात स्त्रीचे सौंदर्य तिच्या नाजूक ओठांवरून ठरते तसे पोळीचे सौंदर्य तिच्या काठान वरुन ठरते.

          मुलींची निरीक्षणशक्ती जन्मताच अफाट असते. लहानपणापासूनच पोळपाटावर छोटासा उंडा ठेवून त्याला गोल आकार देत पुरणपोळीची बाराखडी त्यांना शिकवली जाते. सर्वात कठीण असते ते कणकेच्या उंड्यात पुरणाचा गोळा भरणे. त्याचे तोंड व्यवस्थित दाबता आले पाहिजे नाहीतर सर्व पुरण खापरावर ! पोळी एकीकडे आणि पुरण दुसरीकडे ! तर अशा या पुरणपोळीचे रंजक पुराण मोठे मजेशीर आहे .आज त्याचेच परायण !

                पुरणपोळीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे गहू !आपण वाचत आहात संजीव बावसकर लिखित पोस्ट. यासाठी खास लोकवन या गव्हाची निवड केली जाते कारण त्या पिठामध्ये तांब कमी असते व लवचिकपणा अधिक असतो. गहू चक्की वरून दळुन आणले जातात. पूर्वी हे घरीच जात्यावर दळले जात असत .पिठातील कोंडा काढण्यासाठी  घमेल्यावर कापड बांधून त्यावर पीठ रगडले जाते. वरचा कोंडा निघून जातो व घमेल्यात असते ते वस्त्रगाळ पीठ ! त्याला पिठी म्हटले जाते.

         पीठी भिजवताना त्यात प्रमाणात किंचित मीठ व हळद टाकले जाते. पाणी बेतानेच सोडत कणीक भिजवली जाते. साधारणत: सैलसर कणीक भिजवणे हे खूप जिकिरीचे काम असते कारण पिठी हातालाच जास्त चिकटते. पिठी भिजवल्यावर त्यावर ओले सुती कापड टाकून त्याला एक तासांपर्यंत मुरू द्यावे लागते.      आजकाल पिठी ऐवजी काही ठिकाणी मैदा पण वापरला जातो. मैदा दिसायला पांढराशुभ्र असला तरी पचायला जड असतो म्हणून घरगुती मांडे बनवताना पिठीचाच वापर केला जातो. 

           कणीक मुरेपर्यंत हरभऱ्याची डाळ शिजवून त्यातील पाणी गाळून घ्यावे लागते. हे आमटीसाठी उपयोगात आणतात. शिजलेल्या डाळीमध्ये समप्रमाणात साखर किंवा गुळ टाकला जातो. साखरेच्या पोळ्या पांढरेशुभ्र येतात तर गुळाच्या लालसर! पण खानदेशात गुळाला विशेष प्राधान्य दिले जाते. डाळ व गूळ एकत्र शिजताना त्यात सुंठ पूड, वेलची पूड व जायफळ पूड प्रमाणात मिसळली जाते कारण पचायला जड जाऊ नये म्हणून. चवीपुरते मीठही घातले जाते. त्यामुळे पुरणाला स्वादिष्टता येते. पिठी चांगली मुरल्यावर नारळापेक्षा छोट्या आकाराचे उंडे बनवले जातात. त्याला लोळ्या असे म्हणतात.चूल पेटवून त्यावर खापर तापायला ठेवले जाते. खापर तापवायला चुलीचाच वापर केला जातो. मस्तपैकी अंगणात तीन दगड मांडून चूल तयार करतात. पोळ्या तयार करण्यासाठी वापरात आणलेले खापर वैशिष्ट्यपूर्ण असते .

           कुंभार बांधव त्यासाठी वारुळाची माती व घोड्याची लीद गाळून एकत्र भिजवतात. आठ दिवसांपर्यंत ओली माती रडली जाते. तयार झालेला लगदा एकजीव झाला की चाकावर चढवून त्याचा अर्धगोल बनवतात .त्याचे काठ आतमध्ये दुमडून गोल अर्धबंदिस्त करतात. अर्धगोलावर काडीने एक एक इंच अंतरावर छिद्रे पाडली जातात. अर्धगोल चांगला वाळल्यावर भट्टीत इतर माठांसोबत त्याला भाजतात. आता त्याला खापर असे संबोधले जाते. त्याचा आवाज टणटण येत असतो. त्याच्या आकारानुसार व आवाजानुसार त्याची किंमत ठरते .साधारणत: 400 रुपयांपासून सातशे रुपयांपर्यंत ते विकले जातात.

         नगरदेवळा येथील खापरांना खानदेशात मोठी मागणी आहे कारण त्यांचे वजन हलके असते व टणकपणा अधिक असतो. इथून मालेगाव ,धुळे, जळगाव पर्यंत त्यांची विक्री होते.

            असे हे खापर चुलीवर चढण्यापूर्वी पांढऱ्या मातीने पोतारले जाते. त्यामुळे त्याचा काळपटपणा नाहीसा होतो. पोळ्या पांढरेशुभ्र येतात. पोळ्या बनवण्यापूर्वी कणीक लांबसर ताणली जाते. त्यामुळे त्याच्यात लवचिकपणा येतो. पोळ्या लाटण्यासाठी पोळपाटाला सुती कापड बांधतात .लाटी लाटण्यासाठी बाजरीच्या कोरड्या पिठाचा वापर करतात. त्यामुळे पोळी खुसखुशीत येते व फुटत नाही. पोळीलाला एक वेगळीच चव येते .

पोळी लाटतांना कणकेच्या लोळीच्या आकारापेक्षा दुप्पट मोठा गोळा पुरणाचा घेतात. लोळीची लाटी बनवतात. त्यावर पुरण थापली जाते. वरतून दुसरी लाटी अलगदपणे ठेवतात. दोन्हींची तोंडे बंद करतात व नाजुक हाताने लाटणे फिरवत नेहमीच्या आकाराची पोळी बनवतात. मग अलगदपणे पोळी हातावर उचलून तिला विशिष्ट गती देत, बोटांना आत मध्ये दुमडून, मनगट व हातांच्या मदतीने वरचेवर गोल गोल फिरवतात .

            खापरपोळी बनवणारी महिला खरंच सुगरण असते. तिचीची पोळी बघायला चार जणी जमा होतात. त्यातील दोन जणी तिच्या मदतीला येतात. पुढे हातावर झेलत असताना एखाद्या महिलेला गाण्याची सुरसुरी येते. ' आथानी कैरी, तथानी कैरी, कैरी झोका खाय वं,

 कैरी तुटनी, खडक फुटना, झुयझुय पानी  वहाय वं ।'  गाण्याच्या लयनुसार पोळी फिरते. कैरीसारखी हातावर झोके घेते आणि ' खडक फुटना ' म्हणता बरोबर खापरावर येऊन पडते. मग एकच हास्यकल्लोळ सुरु होतो.

         अशाप्रकारे आखाजीची गाणी गात पोळ्यांना सुरुवात होते. शांतामाय,सोनामाय 'ऑब्झर्वर'  म्हणून उभ्या ठाकतात. घरात खाटेवर पहुडलेली केसरबोय  नजर कमजोर झालेली असतानाही किलकिल्या डोळे करत मानेचा अँटिना डावीकडून उजवीकडे व उजवीकडून डावीकडे फिरवत खापरवरच्या पोळीकडे बघत असते. इथे तिची भूमिका  ' मायक्रो ऑब्झर्वर ' म्हणून असते. पोळीला जरा सुद्धा चटका लागला की हातातली काठी जमिनीवर आपटत तिच्या तोंडाचा पट्टा सुरू होतो. " डोया शेतस काsss फुटी गया वं धानकेसवो. दाताळे काय काढी राहिन्यांत ? पोईसकडे ध्यान नही, खापर तपी गय ना. " 

           मग कुणीतरी पटकन चुलीतली आच  कमी करण्यासाठी सरसावते. योग्य तापमान झाले की पोळ्या खरपूस भाजल्या जातात.केसरबोयच्या चेहऱ्यावरील प्रत्येक सुरकुतीत समाधान झळकते.'  निवाळे हाता त निवाळे माता ' तिची बडबड सुरूच असते. ' जिन्या पोयीले दय , तिन्या नवऱ्याले बय (बळ) ! तिच्याकडे म्हणींचा खजिनाच असतो. 

          आमच्या गल्लीत गुमानमाय व मीरामावशी मांडे टाकण्यात पटाईत ! मांडा खापरावर टाकल्यावर त्याला शेक देणे ही सुद्धा एक कला आहे. आच योग्य प्रमाणात ठेवणे, त्याला परतावणे, खरपूस भाजणे, चटका लागू न देणे,( यात बऱ्याचदा बोटांना चटके लागतात.) तयार झालेल्या पोळीची व्यवस्थित घडी घालावी लागते. तिचे काठ आतमध्ये दुमडून घालावे लागतात .मग ती आकर्षक दिसते. एका पोळीत साधारणत: दोन व्यक्तींचे जेवण होते.

 पान मांडताना उजव्या हाताला पोळीची अर्धी घडी, त्याशेजारी आमटीची वाटी, मध्यभागी आमरसाची वाटी, त्या बाजूला भाताचा मुद,डाव्या बाजूला कुरडई पापड, त्याशेजारी दाटीवाटी करून बसलेले भजे, मध्येच डोकावून पाहणारी लिंबाची फोड, आम्हाला कुणी मान देईल का म्हणून आशाळभूत नजरेने खाणाऱ्याकडे पाहणारे पांढरेशुभ्र मीठ असा साग्रसंगीत मेजवानीचा फड जमतो. खवय्या कितीही तालेवार पहिलवान असू देत. जेवण झाल्यावर हातावर पाणी पडताच पाचच मिनिटात तो चारीमुंड्या चीत होतो. एकदा का त्यांनी जमीन धरली की त्याच्या नाकात उंदीर शिरला तरी त्याला जाग यायची नाही. अशी ही खापरावरची खानदेशी पुरणपोळी ! डोळ्यांना व पोटाला तृप्त करणारी . ' उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म ' या नियमाला फाटा देणारी !!!😊

          🛑🌾 संजीव बावसकर

                     नगरदेवळे

                     जळगाव

( ✍️ आपणास पोस्ट कशी वाटली , लाईक करा, कमेंट करा, अशीच शेअर करा .)

No comments:

Post a Comment