गणपतीची आरती आणि अर्थ
सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची | नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची ||
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची | कंठी झळके माळ मुक्ताफळांची || १ ||
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती | दर्शन मात्रे मन:कामना पुरती || धृ ||
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा | चंदनाची उटी कुंकुमकेशरा ||
हिरेजडित मुकुट शोभतो बरा | रुणझुणती नूपुरें चरणी घागरिया || जय || २ ||
लंबोदर पीतांबर फणिवर वंदना | सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ||
दास रामाचा वाट पाहे सदना | संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना || जय || ३ ||
गणपती सर्व सुखें देणारा आहे. सर्व दु:खे दूर करणारा आहे. तो संकटाचे नांव (शब्द) देखील शिल्लक राहू देत नाही. या देवाची कृपा पुष्कळ प्रेम मिळवून देते. गणपतीचे सर्व अवयव सुंदर आहेत आणि त्याच्यावर शेंदुराची उटी लावलेली आहे. त्याच्या गळ्यामध्ये अत्यंत शोभिवंत सुंदर मोत्याचा हार झळकत आहे. || १ ||
अशा मंगलमूर्तीचा जयजयकार असो. त्याच्या केवळ दर्शनाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. ||धृ ||
हे पार्वतीच्या मुला, तुला रत्नांनी जडविलेला फरा अर्पण केला आहे. ( फरा या शब्दाचे १. पिंपळपान , मुलाच्या कपाळावर लटकविण्याचे रत्नखचित पदक. २. परशु ३. आसन ४.
मुगुटाच्यावरील तुरा ५. खांद्यावर धारण केलेले अलंकार ६. नजराणा, रत्नांनी भरलेले ताट असे अनेक अर्थ आढळतात. ) चंदनाची , कुंकवाची व केशराची उटी तुझ्या अंगाला लावलेली आहे. हिरे जडवलेला मुगुट तुला चांगला शोभून दिसतो आहे. तुझ्या पायात घातलेले घुंगरू रुणझूण असा मंजुळ नाद करत आहेत आणि घागर्या (चाळ) वाजत आहेत. || २ || धृ ||
विशाल उदर असणार्या, पीतांबर धारण करणार्या, शेषनाग ज्याला वंदन करतो अशा ( ‘फणिवर बंधना’ असा पाठभेद मानल्यास – विशाल उदरावर नागाच्या विळख्याने बांधलेले पिवळे वस्त्र धारण करणार्या ) सरळ सोंड असणार्या, हे गणेश देवा, तू अयोग्य वर्तन करणार्यांना , योग्य मार्गावर आणून स्वत:मध्ये सामावून घेतोस. ( सर्वांना सामावून घेण्याइतके तुझे विशाल उदर आहे) म्हणून तू वक्रतुंड आहेस, तुला तीन डोळे आहेत ( तिसरा डोळा म्हणजे ज्ञानाचा निर्देशक आहे. तू अज्ञानाचा नाश करणारा आहेस). मी – रामदास आपल्या निवासस्थानी तुझी वाट पहात थांबलेलो आहे. श्रेष्ठ देव ज्याला वंदन करतात अशा हे गणेशा संकटकाळी धावून यावेस व अंतिम मोक्षापर्यंत माझे रक्षण करावे. ( मला मोक्षामध्ये स्थिर स्थान द्द्यावेस.) अशी माझी तुला प्रार्थना आहे. || ३ || धृ ||
|| इदं न मम् ||
No comments:
Post a Comment