K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday, 11 May 2021

 शिक्षणासाठी संगणकाचा वापर

         भारत सरकारने सर्व शिक्षा अभियान ’ या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कमी किंमतीत लॅपटॉप देण्याची एक भव्य योजना आखली आहे. एकदोन वर्षात असे लॅपटॉप प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात येतील. मात्र याचा उपयोग शिक्षणासाठी न होता मनोरंजनासाठी होऊन मुलांचे अभ्यासातून मन उडेल व त्याचा शिक्षण व्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल अशी भीती मला वाटते.

याचे कारणही तसेच आहे. मोबाईल क्रांतीमुळे संदेशवहन सोपे झाले असले तरी युवावर्गाकडून त्याचा उपयोग फालतु गप्पा व गाणी यासाठीच होत आहे. कानात हेडफोन लावून मोबाईलवरून गाणी ऎकत प्रवास हे तर नित्याचेच झाले आहे. संगणकाचा व इंटरनेटचा उपयोगही मुख्यत्वे ट्विटरआर्कुट व फेसबुकसारख्या सोशल साईटससिनेमागाणीव व्हिडिओ गेम यासाठीच केला जात आहे. दूरदर्शन आज जाहिरातीमनोरंजन व भडक बातम्या यांनी ग्रासला आहे तीच परिस्थिती विद्यार्थ्यांच्या हातातील संगणकाची होईल व शिक्षणासाठी सर्व मोह टाळून कठोर परिश्रम करावे लागतात हेच विद्यार्थी विसरून जातील. हा धोका ओळखून वेळीच त्यावर उपाय योजना करणे आवश्यक आहे.

आज मनोरंजन क्षेत्रातील अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतातील या फार मोठ्या ग्राहकवर्गाला आपल्या प्रभाव क्षेत्रात आणण्यासाठी टपून बसल्या आहेत.अमेरिकेत तीन चार वेळा गेलो असताना तेथील मुलांवर मनोरंजनाचाटॉय इंडस्ट्रीचा जबरस्दस्त पगडा बसल्याचे मला जाणवले. डायनोसॉरस्पायडरमॅनस्टार वार्सहॅरी पॉटर अशा अनेक विषयांवर अशा कंपन्या खेळणीपुस्तकेकपडेवस्तू गाणी व चित्रपट या माध्यमातून एक अनोखेआवडणारे पण भ्रामक विश्व निर्माण करण्यात यशस्वी झाली आहेत. त्यांत त्यांचा हेतू शिक्षण नसून केवळ पैसा वा अधिक फायदा मिळविणे हा आहे. याचे भयावह परिणाम आता तेथील मुलांवर दिसू लागले आहेत. हिंसक व विध्वंसक वृत्तीतील दॊष व परिणाम यांचा ठसा उमटण्याऎवजी त्यात अन्याय व दु:ख नसून शौर्य व आनंद आहे अशी भाबडी कल्पना मुलांच्या मनांत रुजते आहे. या मनोरंजन व्यवसायाची संगणकामुळे प्रचंड वाढ झाली आहे व डायनॉसोरसारखी त्याची भूक वाढली आहे.भारतात आपण आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आक्रमणापासून वाचवावयास हवे.

अमेरिकेत एक गोष्ट चांगली आहे की तेथे प्रौढ व्यक्ती संगणकाचा त्यांच्या नित्य कामासाठी भरपूर उपयोग करीत आहेत. नव्हे त्यांचे जीवनच संगणकाशी निगडीत झाले आहे. मुलांनी काय पहावे काय पाहू नये त्याचा कसा उपयोग करावा हे त्यांना कळते. त्यामुळे त्यांच्याकडे परिस्थिती आटोक्यात आहे.

पण आपल्याकडे याबाबतीत शिक्षक वा पालक यांच्या संगणक अनभिज्ञतेमुळे याचे दुष्परिणाम होण्याचीच अधिक शक्यता आहे. काडेपेटीतील काडीने दिवा लावता येतॊ हे आपल्याला माहीत असते. पण म्हणून आपण काडेपेटी मुलांच्या हातात देत नाही. कारण काडेपेटीने भाजते हेही आपल्याला ठाउक असते. संगणक व इंटरनेटचे साधन शिक्षणासाठी मुलांच्या हातात देताना आपल्याला त्याच्या धोक्यांची माहिती असावयास हवी. अन्यथा सरकारचा एवढा खटाटॊप व प्रचंड खर्च शिक्षण दर्जा सुधारण्याऎवजी शिक्षणाची अधोगती होण्यास कारणीभूत व्हायचा.

आपल्या देशात बहुतेक सर्व प्रौढ व्यक्ती संगणकापासून चार हात दूर आहेत. यात पालक व बहुतेक शिक्षकांचाही समावेश होतो. विद्यार्थ्याच्या हातात संगणक आला की त्याचा तो कशासाठी उपयोग करतो हे कळण्याचीही क्षमता बहुतेकांकडे नाही. अशावेळी संगणक क्रांतीचा उपयोग न होता दुरुपयोग होण्याची अधिक शक्यता आहे.

यावर उपाय कायआपण संगणकक्रांती तर थोपवू शकत नाही. मग शिक्षक व पालकांनी संगणक शिक्षण घेणे आवश्यक आहे. तरच संगणकाचा शिक्षणासाठी उपयोग होऊ शकेल अन्यथा मनोरंजनाच्या मोहजालात आपला विद्यार्थीवर्ग गुरफटला जाईल.

आता संगणक शिक्षण घेणे म्हणजे कायसुदैवाने संगणकाचा वापर टीव्हीइतकाच सोपा झाला आहे. थोडा प्रयत्न केला तर कोणालाही सहज संगणक व इंटरनेट वापराचे ज्ञान मिळविता येईल. प्रश्न आहे तो याची निकड समजण्याचा. संगणकाचा शिक्षणक्षेत्रास खरोखर फायदा हवा असेल तर त्याचा वापरही योग्य पद्धतीने व्हावयास हवा.

संगणक हे साधन आहे साध्य नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. हल्ली शाळेत संगणक शिक्षण हा एक विषय असतो. त्याऎवजी सर्व विषयांच्या शिक्षणासाठी संगणक हे साधन म्हणून प्रत्येकाने वापरले पाहिजे. ती काळाची गरज आहे.

आजकाल आधुनिक डिजिटल स्कूल पद्धतीने प्रभावी शिक्षण देण्याची जाहिरात बहुतेक मोठ्या खाजगी शाळा करीत असतात. यात दिले जाणारे ज्ञान बहुधा परदेशातील कंपन्यांनी विकसित केलेले व इंग्रजीत असते. स्थानिक परिस्थिती व गरज यांचा त्यात अभाव असतो. त्यामुळे अशा शिक्षणाचा प्रत्यक्ष अभ्यासात फारसा उपयोग होत नाही. येथील शिक्षकांनी असे ज्ञान मराठीत विकसित केले तरच त्याचा प्रभावी उपयोग होऊ शकेल.

अर्थात हे सर्व अल्पावधीत करणे अशक्य आहे. यासाठी पहिला टप्पा म्हणजे इंटरनेटवर उपलब्ध असणारे शिक्षणविषयक लेखचित्रे वा धनीचित्रफिती यांचे आवश्यक तेथे मराठीत रुपांतर करून विषयवार वर्गीकरण करून त्याचा साठा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे. यात सर्व शिक्षकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. शिवाय प्रत्येक शाळेत निर्माण होणारे हे ज्ञान एकत्र करून ते वेबसाईटच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचविण्याचे काम करावे लागेल. याला समपातळीवरील ज्ञानप्रसार म्हणता येईल. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी असेच कार्य करून महाविद्यालय पातळीवर मुक्त ज्ञानभांडार निर्माण केले तर त्याचा शाळांना फार फायदा होईल. महाविद्यालय व शाळा यांनी निर्माण केलेले ज्ञान सर्व समाजाला शिक्षित करण्यास व त्यांचे दैनंदिन प्रश्न व अडचणी सोडविण्यास अतिशय उपयुक्त ठरेल. ज्ञानदीप फौंडेशनने यासाठीच ज्ञानदीप मंडळ’ हा महत्वाकांक्षी प्रकल्प सर्व शाळांत सुरू करण्याचे ठरविले आहे.

No comments:

Post a Comment