पालकांनो, लहान मुलांना जपा; कोरोनोचा धोका वाढतोय !
परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असून, आता लहान मुलांनाही त्याची लागण होत आहे. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात शून्य ते १८ वर्षे वयोगटातील ८३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे यासंदर्भात पालकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र भीती निर्माण झाली असताना आतापर्यंत सुरक्षित असलेल्या लहान मुलांनाही कोरोनाची बाधा होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यात शून्य ते ५ वर्षे वयोगटातील १५ मुलांना १ ते ३ एप्रिल दरम्यान कोरेानाची लागण झाली आहे. तर ६ ते १८ वर्षे वयोगटातील ६८ मुलांचा १ ते ३ एप्रिल दरम्यान अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
० ते १८ वयोगटातील एकूण ८३ मुलांवर शहरातील विविध शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे पालकांनी आता लहान मुलांबाबत अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. सुरुवातीला लहान मुलांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत होती. शिवाय गंभीर धोक्याची स्थितीही कमी होती. परंतु, कोरोना विषाणूमध्ये झालेल्या बदलाने संशोधकही चकीत झाले आहेत. त्यामुळे त्यांनीही लहान मुलांची सद्यस्थितीत काळजी घेण्याचे आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे पालकांची जबाबदारी वाढली आहे.
काय आहेत लक्षणे...
कोरोनाची लागण झालेल्या लहान मुलांना सारखा खोकला येऊ शकतो. एकदा खोकल्याची उबळ आली की, जवळपास तासभर किंवा त्याहून अधिक वेळ खोकला येऊ शकतो. खोकल्यामध्ये कफ असल्यास योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. काेरोनाची लागण झालेल्या मुलांना थंडी वाजून ताप येतो, अंग थरथरणे, अंगदुखी, घसा खवखवणे ही लक्षणेही असू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
तज्ज्ञांच्या मते खोकला व ताप याव्यतिरिक्त गंध व तोंडाची चव जाणे हेही लक्षणे असू शकतात.
माहितीचा स्रोत : लोकमत न्यूज नेटवर्क
No comments:
Post a Comment