K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday 13 April 2021

 💉कोरोना लस (Covid 19 Vaccine) कुणी घ्यावी? आणि कुणी नाही?... कोरोना लसीकरणाबाबत तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पहा... 


      🎤 कोरोना लस कुणाला घेता येईल आणि कुणाला नाही? याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA) महाराष्ट्रातील अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे (Dr. Avinash bhondwe) यांनी मार्गदर्शन केलं आहे.

      आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सनंतर सर्वसामान्य नागरिकांचंही कोरोना लसीकरण (Corona vaccination do and don'ts) होत आहे. आता 45 पेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना कोरोना लस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आतापर्यंत 45 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती ज्यांना इतर आजार आहेत आणि 60 पेक्षा जास्त वयाचे म्हणजे ज्येष्ठ नागरिक त्यांना ही लस (corona vaccine) दिली जात होती. पण आता 1 एप्रिलपासून  45 पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना लस (Covid 19 vaccine) दिली जाणार आहे. पण सरसकट सर्वांनाच कोरोना लस  घेता येईल असं नाही. काही जणांना विशिष्ट परिस्थितीत लस घेता येणार नाही. त्यामुळे मला कोरोना लस घेता येईल का? असा प्रश्न तुमच्याही मनात असेल. तुमच्या अशाच काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथं मिळतील.

🎤 डॉ. अविनाश भोंडवे (Dr. Avinash bhondwe) यांनी केलेले मार्गदर्शन -

1) माझी बायको डायबेटिक आहे. ती लस घेऊ शकते का? (My wife is diabetic. Can she get Covid-19 vaccinated?)

डायबेटिज हा कोमॉर्बिड म्हणजे दीर्घकालीन आजारात गणला जातो. अशांना कोरोनाची लागण लवकर होते आणि झाल्यावर रुग्णाची तब्येत गंभीर स्वरूप धारण करू शकते. त्यामुळे मधुमेही व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलीच पाहिजे. 


2) मला दोन वेळा हार्ट अटॅक येऊन गेला आहे. मी लस घेऊ शकतो का? (I've had two heart attacks. Can I get vaccinated?)

हृदयविकाराचा झटका येणं हेदेखील कोमॉर्बिड म्हणजे दीर्घकालीन आजारामध्ये मोडतं. त्यामुळे लसीकरण नक्कीच करून घ्यावं. नोंदणी आणि लसीकरणाबाबतीत वरीलप्रमाणेच नियम आहेत.


3)  माझी नुकतीच बायपास सर्जरी झाली आहे. मी कोरोना लस घेऊ शकतो का? (I recently had bypass surgery. Can I get the corona vaccine?)

बायपास शस्त्रक्रिया हृदयविकारामध्येच केली जात असते. हा आजारही कोमॉर्बिड आजारांमध्ये येत असल्याने जरूर लसीकरण करून घ्यावं.


4) पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर माझ्या नवऱ्याला भरपूर औषधं आणि अनेक गोळ्या सुरू आहेत. त्यानं लस घ्यायची का? (My husband has been on a lot of medications and several pills since he had a paralysis attack. Should he get vaccinated?)

पॅरालिसिस म्हणजेच लकवा किंवा अर्धांगवायू. या आजाराचा समावेश कोमॉर्बिड आजारात होतो. त्यामुळेच त्यांनीही लसीकरण करून घ्यावं. नोंदणी आणि लसीकरणाबाबत वरीलप्रमाणेच नियम आहेत.


5) माझ्या वडिलांना कोरोना होऊन ते पंधरा दिवसांपूर्वीच पूर्ण बरे झाले आहेत. त्यांना लस द्यायची का? (My father had a corona and he was completely healed a fortnight ago. Should he get vaccinated?)

ज्यांना कोरोनाची लागण होऊ गेली आहे, अशांनी त्यातून बरे झाल्या दिवसानंतर 45 दिवसांनी लसीकरण करून घ्यावं.


6) आम्ही आमच्या बाळाचं प्लॅनिंग करत आहोत. माझी बायको गरोदर राहिली तर तिला नंतर लस घेता येईल का? (People under the age of 45 cannot be vaccinated at this stage. But we are planning our baby. If my wife is pregnant, can she get vaccinated later?)

आजमितीला भारतात आणि जगभरात ज्या लशी उपलब्ध झाल्या आहेत, त्या 18 वर्षांखालील मुलं आणि गरोदर स्त्रियांनी घेऊ नयेत असं सांगितलं गेलं आहे. याचं कारण या लशींच्या चाचण्या या 18 वर्षांवरील व्यक्तींच्या आणि गरोदर नसलेल्या स्त्रियांच्याच घेतल्या गेल्या आहेत.


सध्या 18 वर्षांखालील मुला-मुलींच्या लशींच्या चाचण्या सुरू होत आहेत. त्या चाचण्यांमध्ये ती लस या वयोगटाला सुरक्षित आहे असं लक्षात आल्यावरच त्यांचं लसीकरण होऊ शकेल. हीच गोष्ट गरोदर स्त्रियांची आहे. गरोदर स्त्रियांना जेव्हा त्यांच्यासाठी सुरक्षित लस संशोधित होऊन उपलब्ध होईल तेव्हाच त्यांचं लसीकरण होऊ शकेल.


7) सध्या प्रेग्नन्सीमध्ये कोरोना लस घेता येत नाही पण जर गरोदरपणात कोरोना झाला असेल तर डिलीव्हरीनंतर कोरोना लस घेता येईल का? (Corona may have occurred during pregnancy but can be vaccinated after delivery?)

गरोदरावस्थेमध्ये कोरोना झाला असेल तर तिची प्रसूती झाल्यावर एक वर्षाने त्या स्त्रीला लस घेता येईल.


8)  नेहमीच्या ब्लड प्रेशर, डायबेटिसच्या गोळ्या घेऊन लस घेतली तर चालेल ना? (Is it okay to get vaccinated with regular blood pressure and diabetes pills?)

लस घ्यायला जाताना बीपी, मधुमेह किंवा इतर कोणत्याही आजाराच्या गोळ्या आपल्या नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे घ्याव्यातच.


9) लस घेताना खाऊन जायला हवं का? (Should I eat while taking the vaccine?)

लस घेण्यापूर्वी किमान 3 तास आधी काही खाऊन जावं. उपाशी पोटी कोणतीही वेदना सहन करण्याची शक्ती कमी असते. लशीचं इंजेक्शन घेताना जरी फारच कमी दुखत असलं, तरी रिकाम्यापोटी लस घेऊ नये.


10) लस घेतल्यानंतर काय होतं? साइड इफेक्ट्स काय? (What happens after vaccination? What are the side effects?)

आपल्या देशात कोरोनाच्या ज्या लशी दिल्या जात आहेत, त्याने कोणतेही गंभीर साईड इफेक्ट्स होत नाहीत. लस घेताना किंचितसं दुखतं, दुसऱ्या दिवशी इंजेक्शनच्या जागी दंडावर सूज येते. ती दोन-तीन दिवसानंतर आपोआप कमी होते. काही व्यक्तींना दोन दिवस ताप येतो, अंग-हातपाय दुखतात, खूप गळून गेल्यासारखं वाटतं. मात्र ही लक्षणंही दोन-तीन दिवसात त्वरित कमी होतात.क्वचित प्रसंगी काहींना लस घेतल्यानंतर गरगरतं, पण त्यासाठी आपल्याला अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबवलं जातं. काही इतर त्रास झाल्यास डॉक्टर्स आणि उपचाराची सोय असते. कोरोनाची लस घेतल्यावर भारतात आजपर्यंत एकही गंभीर घटना घडलेली नाही. लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे.


11) लस घेतल्यानंतर मला ताप आला तर काय करायचं? कुठली गोळी घ्यायची? (What to do if I get fever after vaccination? Which pill to take?)

लस घेतल्यावर 100 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त ताप आल्यास पॅरासिटेमॉलची 500 मिलिग्रॅमची एक गोळी घ्यावी. मात्र ताप येईल म्हणून लसीकरणाआधी ती मुळीच घेऊ नये.


12) लस घेतल्यानंतर कोरोना होऊ शकतो का? (Can I get infected with coronavirus even after vaccination?)

कोरोनाची लस ही एम-आरएनए पद्धतीची आहे. ती घेतल्यामुळे कोरोना होत नाही. मात्र लशीचा पहिला डोस घेतल्यावर 15 दिवसांनी त्या व्यक्तीमध्ये प्रतिपिंडे तयार होऊ लागतात. त्यानंतर शरीरात ५० टक्के प्रतिकार शक्ती येते. पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. तो घेतल्यानंतर 15 दिवसांनी शरीरात एकूण 95 टक्के प्रतिपिंडे तयार होतात. याचाच अर्थ लस घेतली तरी आपण कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलो, तर पहिल्या 15 दिवसात बाधा होण्याची शक्यता 100 टक्के असते, 15 दिवस ते 43 दिवस या काळात ही शक्यता 50 टक्के असते. त्यानंतरही पुढे बाह्य संसर्गामुळे कोरोना होण्याची शक्यता 95 टक्के राहते.


कोरोनाच्या सध्याच्या लशीचा परिणाम 1 वर्ष टिकतो असं सध्या सांगितलं जात आहे. याचा अर्थ एक वर्षानंतर बाह्य संसर्गामुळे पुन्हा कोरोनाची बाधा होण्याची शक्यता टाळता येत नाही.


13) माझ्या व्यवसायासाठी मला फिरावं लागतं. लस घेतल्यानंतर मी लगेच प्रवास करू शकतो का? (I have to travel for my business. Can I travel immediately after vaccination?)

लस घेतल्यानंतर काही व्यक्तींना गरगरू शकतं. त्यापुढील 3 ते 7 दिवसात ताप येणं, अंग दुखणं, मळमळणं अशी लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे लस घेतल्यावर किमान आठवडाभर खूप लांबच्या प्रवासाला लगेच जाऊ नये. आपल्या गावातील अत्यावश्यक कामांसाठी आपण फिरू शकता. आपल्या कामाला जायलाही हरकत नसते.


14) शारिरीक कष्टाची कामं करते. लस घेऊन लगेच कामाला जाऊ शकते का? (I am doing physical hardwork. Can I get vaccinated and go to work immediately?)

आपल्या रोजच्या कामांना हरकत नसते. शारीरिक कष्टाची कामं असल्यास किमान दोन-तीन दिवस तब्येतीचं निरीक्षण करावं लागतं. ताप, अंगदुखी असे त्रास असल्यास शक्तीची कामं होऊ शकत नाहीत. साहजिकच किमान तीन दिवस कामावरून रजा घ्यावी.


15) लस घेतल्यानंतर स्तनपान करू शकतो का? (Can I breastfeed after vaccination?)

ज्या महिलांना एक वर्षाचे बाळ आहे आणि ज्या त्यांना स्तनपान करतात, अशा मातांनी लस घेऊ नये. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना फारशा स्पष्ट नाहीत. मात्र मातेने लस घेतल्यावर त्याचा अंश तिच्या दुधात उतरतो. त्याचा परिणाम बालकांवर काय होतो यावर संशोधन झालं नसल्याने सध्यातरी एक वर्षापर्यंत वयाचे बाळ असलेल्या स्त्रियांनी लस घेऊ नये. त्यामुळे स्तनपानाचा प्रश्न येतच नाही.

माहितीचा स्रोत : न्यूज18 लोकमत🙏
==============================

🦠💉 कोरोना लसीकरणाबाबत अनेकांना प्रश्न पडलेत. सामान्यांना पडलेल्या प्रश्नांची आम्ही लसीकरण अधिकारी आणि केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडून उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न केला.

देशात कोव्हिड-19 लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. देशामधल्या 45 वर्षांवरच्या सर्व नागरिकांना आता लस घेता येईल.

केंद्राच्या नियमावलीनुसार 'को-विन' अॅपचा लसीकरण नोंदणीसाठी वापर बंधनकरक करण्यात आला आहे.

कोरोनाच्या स्वॅब टेस्ट आधी घरच्या घरी 'ही' चाचणी करुन पाहा
कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?

1. कोविनवरून लसीसाठी नोंदणी कशी करायची?
https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा फोननंबर रजिस्टर करू शकता. त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तींना लस घ्यायची आहे, त्यांचा तपशील भरून त्यांचं नाव नोंदवता येईल. यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्रांमधले उपलब्ध स्लॉट्स तपासून तुमच्यासाठी एक वेळ बुक करू शकता.

Co-Win वरून नोंदणी करण्यासाठीची तपशीलवार प्रक्रिया इथे वाचा - Co-WIN ॲपवरून कोरोना लसीकरणासाठी नोंदणी कशी करायची?

2. थेट रुग्णालयात गेलो तर लस मिळेल का?
केंद्र आणि राज्य सरकारच्या विमा योजनेशी संलग्न खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीप्रमाणे, राज्यांना यासाठी तीन पद्धतीने नोंदणी करण्यास सांगण्यात आलंय.

१) आगाऊ स्वयं नोंदणी
२) प्रत्यक्ष जागेवर नोंदणी
३) सुविधात्मक सहकारी नोंदणी

       महाराष्ट्राच्या लसीकरण कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. डी. एन. पाटील सांगतात, "केंद्राच्या नियमावलीनुसार खासगी रुग्णालयात को-विन ॲपमध्ये नोंदणी केल्याशिवाय लस मिळणार नाही. सरकारी रुग्णालयात मात्र वॉक-इन किंवा ऑन-साइट नोंदणी करून लस घेता येऊ शकते."

त्यामुळे नोंदणीशिवाय खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी दाखल झालात तर तुम्हाला लस मिळणार नाही.

पण तुम्ही सरकारी रुग्णालयात को-विन ॲपशिवाय थेट रुग्णालयात जाऊन नोंदणी करून लस घेऊ शकता.

3. माझ्या फोनवरून शेजारच्या आजींचं नाव नोंदवता येईल का?
लोकांना को-विन ॲपबाबत माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारने युजर मॅन्युअल जारी केलंय.

या युजर मॅन्युअलनुसार, एका मोबाईलवरून स्वत:सोबत इतर 3 लोकांची लसीकरणासाठी नोंदणी करता येऊ शकते.

त्यामुळे तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिकांची नोंद केल्यानंतर तुम्ही शेजारच्या आजी-आजोबा यांची नोंदणी करू शकता.

4. मोबाईल किंवा इंटरनेट नाही, त्यांना लस कशी मिळेल?
राज्यातील ग्रामीण भागात आणि शहरी भागात रहाणाऱ्या अनेकांकडे स्मार्टफोन नाहीत. मग अशा ज्येष्ठ नागरिकांनी किंवा इतर आजार असलेल्यांनी काय करावं?

याबाबत डॉ. पाटील सांगतात, "राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात ऑन-साइट नोंदणी आहे. लोक थेट लसीकरण केंद्रावर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात."

5. पहिली लस घेतली पण, दुसरी राहिली तर?
महाराष्ट्राचे लसीकरण मोहीम प्रमुख डॉ. डी. एन. पाटील पुढे सांगतात, "लसीचा एक डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागेल. लस घेतल्यानंतर 28व्या दिवशी पुन्हा एक मेसेज पाठवला जाईल. जेणेकरून लोकांना दुसरा डोस घेण्यासाठी जायचंय हे समजेल."

"मेसेजनंतर दोन-तीन दिवसांनी लस घेतली तरी चालेल. पण, दुसरा डोस घ्यायचा, हे आपणच लक्षात ठेवलं पाहिजे. सरकार प्रत्येक गोष्टीवर लक्ष कसं ठेवणार? लोकांनी सहकार्य केलं पाहिजे," असं लसीकरण मोहिमेतील एक अधिकारी सांगतात.

6. लसीकरण वेळेचे काही स्लॉट आहेत?
लसीकरणासाठी राज्यांना विविध स्लॉट किंवा वेळा ठरवण्यासंदर्भात केंद्राने नियमावली दिली आहे.

मोबिलायझेशन स्लॉट - या वेळेत ऑन-साईट नोंदणी करून लसीकरण केलं जाणार आहे. आधी नोंदणी केलेल्यांना यावेळात लसीकरण करता येणार नाही.


लसीकरण केंद्रावर काही वेळ पहिला डोस घेऊन दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्यांसाठी ठेवण्यात आलाय.

ओपन स्लॉट - यावेळात सामान्य नागरिक लस घेऊ शकतील.

त्यामुळे जर रजिस्ट्रेशनच्या वेळी तुम्हाला सकाळी, दुपारी अशा वेळा मिळाल्या असतील तर त्या वेळेत पोहोचून लस घ्या.

7. कोव्हिड होऊन गेल्यानंतर किती दिवसांनी लस घ्यावी?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार,

कोरोनामुक्त झाल्यानंतर किती दिवसांनी शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होते. यामुळे किती दिवस संरक्षण मिळतं. याबद्दल अजूनही ठोस माहिती नाही. त्यामुळे कोरोनामुक्त झाल्यानंतर लस घेण्याची शिफारस करण्यात आलीये.

कोरोना संसर्ग बरा झाल्यानंतर 4 ते 8 आठवड्यांनी लस घेता येऊ शकते.

8. किडनी, मधुमेह, हृदयरोग असेल तर लस घेणं सुरक्षित आहे?
कोव्हिडविरोधी लस 45 ते 59 वर्षं वयोगटातील कोमॉर्बिड रुग्णांना दिली जाणार आहे. कोव्हिड संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्यात कोमॉर्बिड रुग्णांची संख्या जास्त आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, लस इतर आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी सुरक्षित आहे. अशा रुग्णांना कोरोनाविरोधी लस घेण्याचे खूप फायदे आहेत.

पण, लसीबद्दल प्रश्न असतील तर डॉक्टरांना विचारून शंका निरसन करून घ्यावं

9. लस घेण्याआधी औषधं घेऊ नयेत?
मधुमेह, किडनी आणि हृदयरोगाने ग्रस्त रुग्णांना औषध घ्यावी लागतात. सरकारच्या माहितीनुसार, कोव्हिड-19 लस घेण्याआधी कोणती औषधं घेऊ नयेत याबाबत विशेष सूचना नाही. सामान्यतः सुरू असलेली औषधं घेता येऊ शकतात.

लस देणाऱ्यांना तुम्ही कोणती औषधं घेत आहात याबाबत माहिती द्या.

10. लस घेतल्यावर काय खबरदारी घेऊ?
तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक लशीचे साइट इफेक्ट असतात. त्यामुळे घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही.

लस दिल्यानंतर अर्धातास लसीकरण केंद्रावरच लस दिलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवलं जातं.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार,

लस सुरक्षित आहे. लस घेतल्यानंतर काही त्रास जाणवला तर, जवळच्या आरोग्य केंद्रात जावं किंवा कोविन अॅपवरून लसीकरण झाल्यानंतर आलेल्या एसएमएसमध्ये नाव दिलेल्या डॉक्टरला फोन करावा.

11. लस फुकट आहे की पैसे देऊन?
सरकारी लसीकरण केंद्रांवर कोव्हिड-19 विरोधी लस मोफत दिली जात आहे.

राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं, जिल्हा रुग्णालयं, ग्रामीण रुग्णालयं, कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोरोनाविरोधी लस फुकट दिली जाईल. केंद्रीय आरोग्य विभागाच्या रुग्णालयातही कोव्हिड-19 विरोधी लस मोफत मिळणार आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये मात्र लस घेण्यासाठी 250 रूपये मोजावे लागतील. यात 150 रूपये लशीची किंमत आणि 100 रुपये ऑपरेशन चार्जसाठी घेतले जातील.

12. लस घेतल्यानंतर किती दिवसात शरीरात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होईल?
कोव्हिड-19 विरोधी लस दोन टप्प्यात दिली जाणार आहे. पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 2 ते 3 आठवड्यांनी रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते.

महाराष्ट्राचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास सांगतात, "पहिला डोस घेतल्यानंतर साधारणत: 42 दिवसांनी शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होते. पण, यासाठी लसीचा दुसरा डोस 28व्या दिवशी घेणं गरजेचं आहे."

13. लस घेतल्यानंतर संरक्षण किती दिवस मिळेल?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, कोव्हिड-19 विरोधी लस घेतल्यानंतर शरीरात तयार झालेली रोगप्रतिकारशक्ती किती दिवस टिकेल हे अजूनही निर्धारित करण्यात आलेलं नाही. त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क घालणं, हात धूणं, सोशल डिस्टंसिंगचं पालन महत्त्वाचं आहे.

14. कोरोनाविरोधी लस म्युटेट झालेल्या कोव्हिड-19 वर प्रभावी आहे?
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, लस व्हायरसविरोधात एकापेक्षा जास्त अॅन्टीबॉडी तयार करतात. स्पाईक प्रोटीन विरोधातही अॅन्टीबॉडी तयार होतात. त्यामुळे लस म्युटेट झालेल्या कोव्हिड-19 व्हायरसवर प्रभावी नक्कीच असेल. त्यासोबत अभ्यासातून निदर्शनास आलंय की, म्युटेशनमुळे लसीच्या प्रभावावर काही परिणाम होणार नाही.

15. एचआयव्हीग्रस्त व्यक्ती लस घेऊ शकतात?
केंद्र सरकारच्या माहितीनुसार, एचआयव्हीग्रस्त आणि कॅन्सरची औषध घेणाऱ्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असते.

       पण, सद्य स्थितीत उपलब्ध असलेल्या लशींमध्ये जिवंत व्हायरस नाही. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी असणारे व्यक्ती लस घेऊ शकतात. पण, त्यांच्यासाठी लस तेवढी प्रभावी नसेल.
माहितीचा स्रोत : बीबीसी न्यूज🙏

लसीकरणाच्या वेळी घ्यायची काळजी

या व्यतिरिक्त, लस घेताना नेमकी काय काळजी घ्यायची आहे, लस कुणी घ्यावी, कुणी घेऊ नये यावरही आरोग्य मंत्रालयाने एक पत्रक जारी केलं आहे. राज्यसरकार आणि केंद्रसरकारला ते पाठवण्यात आलंय. त्यातलेही मुद्दे बघूया.

18 वर्षांवरील लोकांचंच लसीकरण करण्यात येईल.
दोन लशींना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. पण, एका व्यक्तीला दोन डोस देताना एकाच प्रकारची लस दिली जावी.
पहिला डोस घेतल्यावर एखाद्या व्यक्तीला लशीची रिॲक्शन आली, म्हणजे लसीचे काही विपरित परिणाम दिसून आले तर, अशा व्यक्तीला दुसरा डोस दिला जाऊ नये.
गर्भवती किंवा बाळ अंगावर पिणारं असेल तर अशा महिलेनं लस घेऊ नये. लशीच्या चाचण्या गर्भवती महिलांवर झालेल्या नाहीत, त्यामुळे त्या अशा महिलांवर कसा परिणाम करतात हे माहीत नाही. म्हणून हा निर्णय झालाय.
ज्यांना सध्या कोव्हिड-19 झालेला आहे आणि ते उपचार घेतायत अशांना लस देण्यात येऊ नये. आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्यावर चौदा दिवसांनंतर अशा व्यक्तींचा विचार होऊ शकतो.
कोरोना लसीकरणावर बरीच माहिती समोर येते आहे. त्यातली कुठली खरी, कुठली खोटी हा प्रश्नही आहे. त्यामुळे सरकारी वेबसाईट्सवर बरीच माहिती आतापर्यंत आलेली आहे. आरोग्यविभागाची वेबसाईट, पीआयबी वेबसाईट. अशा अधिकृत माध्यमांवरच विश्वास ठेवा. मिळालेली माहिती पारखून घ्या.


लस घेण्यात संकोच आणि लसीची सुरक्षितता

या लसीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे कोणतेही केस रिपोर्ट्स आलेले नाहीत. या लसीमुळे अनेक अवयव कशातही समाविष्ट होतील असे काहीही घडत नाही. या लसीमुळे नपुंसकत्व येत नाही किंवा मेंदू, हृदय किंवा पाठीचा मणका यांचे काहीही नुकसान होत नाही. या लसीचे साईड इफेक्ट्स इन्फल्युएंझा लसीपेक्षाही सौम्य असल्याचे आढळून आले आहे. प्रभावासंदर्भात बोलायचे झाल्यास ही लस सुरक्षित आहे. या लसीचा प्रत्यक्ष प्रभाव विविध प्रकारच्या पर्यावरणात्मक आणि व्यवस्थापकीय लॉजिस्टिक कारणांमुळे कमी होतो. ५०-६०% पेक्षा जास्त प्रभावी असलेली कोणतीही लस तिची प्रत्यक्ष कामगिरी अतिशय चांगल्या प्रकारे बजावत असल्याचे सिद्ध झाले आहे.

लस घेण्यात वाटत असलेला संकोच हा अज्ञान आणि अहंकार यांच्या मिश्रणातून निर्माण होतो. मोठ्या प्रमाणावर सामाजिक जागरूकता घडवून आणत हा संकोच दूर केला गेला पाहिजे. सर्वात आधी कोट्यवधी आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही लस घेतली आहे. हा संदेश सर्वत्र पोहोचला पाहिजे. शास्त्रोक्त, योग्य माहिती प्रत्येक व्यक्तीने पसरवली पाहिजे. प्रत्येक डॉक्टरने वॅक्सीन अम्बॅसॅडर बनले पाहिजे. योग्य जागरूकता निर्माण झाली की लसीबाबतचा संकोच नक्की दूर होऊ शकतो. लस घेण्यात संकोच करणारी व्यक्ती देशाचे आणि संपूर्ण जगाचे खूप मोठे नुकसान करत असते हे प्रत्येकाने ध्यानात ठेवले पाहिजे. जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती सुरक्षित होत नाही तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. त्यामुळे आपल्याला हा जागरूकता संदेश लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. सर्वोत्तम सुरक्षेसह संपूर्ण भारत रोगप्रतिकारासाठी सक्षम बनला पाहिजे.

No comments:

Post a Comment