CBSE बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द; बारावीच्या परीक्षा लांबणीवर
CBSE बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा स्थगित करण्याचा मोठा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
CBSE 10th 12th Exams 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी रद्द करण्यात आल्या आहेत, तर बारावीच्या परीक्षा तूर्त स्थगित करण्यात आल्या आहेत. सीबीएसई दहावीची परीक्षा ४ मे ते ७ जून या कालावधीत होणार होती तर बारावीची परीक्षा ४ मे ते १४ जून या कालावधीत होणार होती. दहावीची परीक्षा आता होणार नाही तर बारावीच्या परीक्षेबाबत १ जून नंतर परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. लाखो विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
वाढत्या कोविड-१९ संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी जोरदार मागणी सर्व स्तरातून होत होती आज बुधवारी दुपारी एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. यानंतर या निर्णयाची घोषणा करण्यात आली.
कसा तयार होईल दहावीचा निकाल?
सीबीएसई बोर्डाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होत आहे की परीक्षाच रद्द केल्या जात आहेत. दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याने आता प्रश्न असा आहे की या विद्यार्थ्यांचा निकाल कसा तयार केला जाईल? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली. सीबीएसई बोर्डामार्फतच मूल्यांकनाचे मापदंड तयार करण्यात येणार आहेत, त्या आधारे सीबीएसई दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल तयार केला जाणार आहे.
बोर्डाद्वारे ठरवलेल्या निकषांद्वारे तयार केलेल्या निकालावर जर विद्यार्थी समाधानी नसेल, तर त्याला पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी दिली जाईल. करोना स्थिती सामान्य झाल्यानंतर अशा विद्यार्थ्यांची परीक्षा सीबीएसई बोर्ड आयोजित करेल.
सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांबाबत बोर्डाने जारी केलेले परिपत्रक पुढीलप्रमाणे - सीबीएसई परीक्षा परिपत्रक
बारावीची परीक्षा कधी होणार?
सीबीएसई बोर्डाने परीक्षांच्या निर्णयासंबंधी परिपत्रक जारी केले आहे. बोर्डाने म्हटले आहे की बारावीच्या परीक्षा ४ मे ते १४ जून या कालावधीत होणार होत्या. पण त्या तूर्त स्थगित करण्यात आल्या आहेत. १ जून २०२१ रोजी कोविड-१९ परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर परीक्षेच्या आयोजनासंदर्भात निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधी किमान १५ दिवसांची नोटिस देण्यात येईल. म्हणजेच परीक्षांच्या तारखांची घोषणा आणि प्रत्यक्ष परीक्षा यादरम्यान किमान १५ दिवसांचा कालावधी असेल.
स्रोत : म.टा.
No comments:
Post a Comment