मुलांच्या राग, चिडचिड व आक्रस्ताळीपणावर उपाय
मुलांच्या भावनांशी समरस होऊन त्यांच्या राग, चिडचिडेपणा, अबोला, हट्टीपणा, आदळ-आपट व आक्रस्ताळीपणा यावर विजय मिळवण्यासाठी पुढील टिप्स् चा उपयोग करा.
गेल्या अनेक महिन्यांपासून ऑनलाइन शाळा सुरु आहेत. तसंच खेळायला घराबाहेर जाता येत नाही. त्यामुळे आपल्या लहानग्यांचा दिवसातील बराचसा वेळ मोबाइल, टीव्ही या माध्यमावर जातोय. यातूनच प्रचंड प्रमाणात वाढलेला स्क्रीन टाइम आणि टीव्ही-मोबाइलवर पाहिल्या गेलेल्या घातक दृश्यांमुळे मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम होत आहे. यामुळे मुलं रागीट आणि चिडचिडी होत आहेत.
सध्याच्या काळात आणि नंतरही मुलामुलींच्या वर्तनामध्ये बदल घडताना दिसत आहेत. काहींमध्ये वर्तन समस्याही दिसत आहेत. हट्टीपणा, आक्रस्ताळीपणा वाढला आहे. बऱ्याच मुलांमध्ये मोबाइलचं वेड वाढलं आहे. तर काहींना नैराश्य तर काही चिंताग्रस्त होताना दिसत आहेत.
भावनांच्या निगडित क्षमता :-
कौशल्यं कमी असल्यास मुलं चुकीच्या पद्धतीने व्यक्त होतात, त्याला आपण गैरवर्तणूक म्हणतो. मुलांच्या प्रत्येक वर्तनाच्या मागे काहीतरी भावना असतात उदा. हट्टीपणा\आक्रमकता. यामागे राग, एकाकीपणा, कंटाळा या भावना असू शकतात. मुलांच्या वर्तनांना समोरं जाताना पालक म्हणून त्यांच्या भावनांना योग्य प्रतिसाद देणं अपेक्षित असतं. ते योग्य प्रकारे झालं नाही तर वर्तणुकीमध्ये बदल होताना दिसत नाहीत. पालक म्हणून आपला भावनांबद्दल दृष्टिकोन काय आहे यावर बऱ्याचदा सर्व अवलंबून असतं. उदा. भीती कमकुवत बनवते, रागापासून चार हात दूर राहा, भावना कमकुवत बनवतात, मनाने सक्षम राहिलं पाहिजे असा चुकीचा दृष्टिकोन बघावयास मिळतो. भावना काहीतरी उपयुक्त संदेश घेऊन येते असं नवीन संशोधनातून निष्पन्न झालं आहे. राग आणि भीती यासारख्या नकारात्मक भावनाही आपल्याला तितक्याच गरजेच्या आहेत. मुलांच्या भावना नजरेआड करतो, त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
मुलांच्या भावनांचे कोच व्हा! :-
मुलांमध्ये तीव्र भावना असताना संवाद साधताना आपण त्यांच्या भावनांचे कोच होऊ शकतो. कल्पना करा तुमचा ८ वर्षांचा मुलगा मोबाइल न मिळाल्यामुळे प्रचंड उद्वेगानं वस्तूंची फेकाफेक करत आहे. पालक समोर हे सर्व बघत आहेत. मुलांच्या वर्तनाला आणि त्यामागील भावनांना सामोरं कसं जाल?
भावनांकडे लक्ष द्या :-
स्वतःच्या आणि मुलांच्या भावनांकडे लक्ष द्या. त्या चाणाक्षपणे ओळखा. स्वतःच्या आणि मुलांच्या मानसिक विश्वाशी समरस होणं म्हणजेच त्या भावना ओळखणं गरजेचं आहे. तुमच्या मनातील भावनांचं भान असू द्या. तुमच्या आणि मुलाच्या देहबोलीतून, बोलण्याच्या टोनमधून कुठल्या भावना प्रतिबिंबित होत आहेत ते पाहा.
स्वीकार करा :-
भावना दुर्लक्षित न करता किंवा नामंजूर न करता त्या भावनांचा पूर्णपणे स्वीकार करा. हे भावनिक क्षण मुलाशी संलग्न होण्यासाठी आवश्यक आहेत. मुलाच्या वर्तनावर टीका टिपण्णी न करता किंवा मुलाला कुठलंही लेबल न लावता संवाद साधा.
शब्द द्या :-
'मोबाइल न मिळाल्यामुळे तुला खूप राग येतोय आणि वाईटही वाटत आहे असं दिसतंय', अशा प्रकारे भावनांना जेव्हा शब्द मिळतात तेव्हा त्यांची तीव्रता कमी होते. इथे त्याला कसं वाटायला हवं हे सांगू नका. कुठलेही सल्ले देऊ नका किंवा टीका करू नका.
आठवण करून द्या :-
तुम्ही भावना स्वीकार केल्या आहेत, पण वर्तन नाही. वस्तूंची फेकाफेक करणं हे वर्तन अजिबात स्वीकारार्ह नाही. 'फेकाफेक करणं मला अजिबात आवडलं नाही. आपल्याकडे राग आल्यावर फेकाफेक करत नाहीत', असं मुलांना वेळोवेळी सांगा.
योग्य पर्याय निवडण्यास प्रोत्साहन :-
वर्तनाला लक्ष्मणरेषा आखून वर्तन नामंजूर केल्यावर प्रश्नानिराकरण करण्यास प्रोत्साहन द्या. 'पुढच्या वेळेस राग आल्यावर काय करशील? मोबाइल अति बघण्याचा प्रश्न एकत्र येऊन सोडवू या का?' अशा प्रकारे संवाद साधा. इथे तुम्ही वर्तनाची दिशा दाखवत आहात. कुठेही टीका टिपण्णी न करता, सल्ले न देता, लेक्चरिंग न करता, न रागावता, न मारता हे सर्व करत आहात. खऱ्या अर्थानं तुम्ही मुलाच्या भावनांचे कोच होत आहात!
वेळापत्रक करा सेट :-
पाल्याला वेळापत्रक तयार करून देण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. यामुळे जगात बदल होत असले तरी त्यांच्या नित्यक्रमात अनेक गोष्टी स्थिर असल्यास त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण होते. आठवडाभराचं वेळापत्रक तयार करा आणि आठवड्याच्या शेवटी काही गमतीशीर उपक्रमांचा समावेश करा. यामुळे आपला पाल्य व्यग्र राहून ऊर्जेचा पूरेपूर वापर करू शकेल. मुलांना योग्य वेळी जेवण आणि पुरेशी झोप घेता येईल असं नियोजन करा. याचबरोबर वेळापत्रकात सेट केलेल्या वेळा पाळण्यासाठी मुलांना सतत सूचना न करता त्यांच्या कलाने घ्यावं. इंटरनेटवर घालवायच्या वेळेचं नियोजन करण्याबरोबरच योग्य वेळी ब्रेक घेणं आणि इंटरनेटवर अवलंबून न राहण्याचं तंत्र शिकवा.
करा स्वतःचं निरीक्षण :-
लहान मुलं पालकांचं अनुकरण करतात. पालक ज्याप्रकारे ताणतणावाच्या वेळी प्रतिक्रिया देतात त्याच प्रकारे मुलं त्याचंही अनुकरण करतात. त्यामुळे पालकांनी ते स्वतः ताणतणावाच्या वेळी कोणत्या प्रकारच्या प्रतिक्रिया देतात याचं निरीक्षण करणं महत्त्वाचं आहे. जर पालक रागाने प्रतिक्रिया देत असतील तर मूलही असं करण्याकडे आकर्षित होऊ शकतं. हे लक्षात घेऊन आपल्या वागणुकीत बदल करा.
बना स्मार्ट पालक :-
मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी, त्यांचा राग नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना शिक्षा न करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. शिक्षेची परिणामकारकता काळानुसार आणि वयानुसार बदलत जाते. मुलांना कृती-परिणामांबद्दलची कल्पना द्या.
संकलित
No comments:
Post a Comment