K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Sunday, 31 January 2021

वाढत जाणा-या लठ्ठपणामागील कारणं समजत नाहीयेत? मग आहारतज्ज्ञांनी सांगितलेली 'ही' कारणे व उपाय नक्की जाणून घ्या!

     लॉकडाउनची नांदी झाली आणि दुःखात सुख म्हणतात तसे आता घरूनच काम करायचे आहे म्हणून सर्वांनाच छान वाटू लागले. परिस्थिती अर्थात गंभीर होती आणि आहे ती नोकरी टिकते, की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. आत्तापर्यंत घडू शकले नाही ते वर्क फ्रॉम होम सुरू झाले आणि प्रवास, ट्रॅफिकची कटकट नाही, घरात आपल्या माणसांबरोबर वेळ घालवता येईल, आपल्या घरट्यात पिलाबाळांसकट सुरक्षित राहता येईल, या भावनेने मनाला बरेही वाटू लागले. हा आनंद काही काळच टिकला, कारण लॉकडाउन वाढू लागले, तसे कामाचे तासही वाढायला लागले आणि नाश्ता-जेवणाच्या सवयी, पद्धत, प्रमाण बदलून 'वदनी कवल घेता...'ची स्वर्गानुभूती बाजूला राहून वजनाच्या तक्रारी डोके वर काढू लागल्या.

     घरात असल्याने मुले, जोडीदार आणि ज्येष्ठ यांच्या अपेक्षा वाढीस लागल्या. घर आणि ऑफिस याचा समतोल एका हाती साधताना तारेवरची कसरत होऊ लागली. कामाचे वाढलेले तास, विविध शिफ्ट, परदेशात क्लाएंट असल्याने त्यांच्या वेळेनुसार रात्री उशिरापर्यंत मीटिंग, कॉल्स सुरू झाले. आधी काम आणि घर हे वेगळे विभाग होते, त्यांची सरमिसळ होऊ लागली. आधी जी जीवनशैली होती, जसे, की जिमला जाणे, धावणे, चालणे, पोहणे एवढेच नव्हे, तर ऑफिसला जाण्यासाठी तयार होणे, बसस्टॉप, कारपर्यंत चालणे, ऑफिसच्या परिसरात फिरणे, जिने चढणे-उतरणे या सर्वांवर बंधने आली. घरे लहान असल्याने तिथेच घरकाम आणि ऑफिसचे काम असल्याने व्यायामासाठी वेगळा वेळ देणे अशक्य होऊ लागले. केवळ दगदग होऊ लागली आणि दगदग म्हणजे व्यायाम नव्हे.

     या तक्रारींची यादी काही संपलेली नाही. व्यायाम, पुरेशी झोप, फिरणे, ठरावीक डबा, नाश्ता करायची वेळ याचे गणित बिघडले. घरी सोफा, झोपाळा, बेड, खुर्ची, किचन असे वाटेल तसे बसून पाठीचा कणा, मान, खांदा यांचे त्रास होऊ लागले. सतत स्क्रीनवर बघून डोळ्यांच्या तक्रारीही वाढल्या. हे सगळे सहन करायचे कारण म्हणजे, आहे नोकरी टिकवायची धडपड. त्यामुळे डेडलाइन, अपुरी झोप या बरोबरच मानसिक ताणही वाढला. व्यवस्थित झोप, योग्य आहार आणि उत्तम व्यायाम ही चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे; पण तेच कठीण होऊन बसले आहे. एकूणच, या काळात योग्य खाणे, आहार आणि आरोग्य यावर मोठा परिणाम झाला.

कुठे बिघडते?

१. मानसिक ताण असला, की शरीरात 'कॉर्टिसोल' या संप्रेरकाचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे संप्रेरकांचा समतोल बिघडून सतत भूक लागणे, गोड खावेसे वाटू लागते.

२. मीटिंग आणि कॉल सुरू असतानाच कधी कधी जेवण करावे लागते. त्यामुळे परिपूर्ण आहार असला, तरी खाण्यातून लक्ष उडते, 'ओव्हर इटिंग' होते किंवा पदार्थ न चावता गिळायला होते. यामुळे साहजिकच वजन वाढणे, अपचन, अॅसिडिटी या तक्रारी वाढतात.

३. उशिरा चालणाऱ्या मीटिंगमुळे रात्री बिस्किटे, मॅगी खा, कॉफी प्या असे प्रकार होतात. तसेच, नवीन पदार्थ करण्याच्या ट्रेंडमुळे गोड आणि तेलकट खाण्याचे प्रमाण वाढीस लागून वजनही वाढते. यावर आता मर्यादा हवी.

४. नैसर्गिक चक्रानुसार आपण उठले पाहिजे, वेळेवर नाश्ता केला पाहिजे आणि जठराग्नी ज्यावेळी व्यवस्थित प्रज्वलित असेल त्यावेळी म्हणजे सूर्य डोक्यावर असताना, तसेच रात्री लवकर जेवणे तितकेच महत्त्वाचे; पण आता जेवणाच्या वेळा पाळणे अवघड झाले आहे. रात्री-बेरात्री खाण्यामुळे निसर्गचक्र बिघडते. यामुळे संप्रेरकांचे असंतुलन, केस गळणे, टक्कल पडणे, पोट सुटणे, पित्त अशा तक्रारी वाढू लागतात.

५. कमी हालचाल आणि इन्फेक्शनच्या भीतीने कमी भाज्या फळे खाल्याने आणि कामात पाणी पिण्याचीही आठवण न राहिल्याने अनेकांना बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि मूळव्याध याचाही त्रास सुरू झाला. स्वच्छतेची योग्य खबरदारी घेऊन मनातून ही भीती आता कमी करायला हवी.

६. व्यायाम, झोप नीट नसल्याने अनेकांची आळस आणि कामढकल करण्याची वृत्ती तयार झाल्याने तेही आरोग्यास मारक ठरले.

७. जे घरापासून दूर राहत होते, त्यांच्या जेवणाची आणि आहाराची अजूनच आबाळ झाली. आता यावर लक्ष देऊन तोडगा काढणे आवश्यक आहे.

'वर्क फ्रॉम होम'मुळे नाश्ता आणि जेवणाच्या सवयी बदलल्या. समोर लॅपटॉपवर काम आणि हातात जेवणाचे ताट हे वेळ वाचवण्यासारखे वाटत असले, तरी आरोग्याच्या दृष्टीने हानिकारकच आहे.

     'वर्क फ्रॉम होम' कदाचित आणखी काही काळ पुढे चालेल, त्यामुळे वेळीच सावध होत आत्तापर्यंत जाणवलेल्या तक्रारींवर तोडगा काढणे आपल्याच हातात आहे.

१. काही जणांनी पोश्चर नीट राहावे आणि पाठ, मान याला त्रास होऊ नये म्हणून टेबल, खुर्ची याची बसायची खास सोय करून घेतली आहे.

२. डोळ्यांना त्रास होऊ नये यासाठी मोठ्या स्क्रीनची सोय केली.

३. ठरावीक काळाने स्ट्रेचिंग केले तर उत्तम.

४. दिवसातून अर्धा एक तास काढून सूर्यनमस्कार किंवा यू-ट्यूबवर झुंबा किंवा इतर व्यायामप्रकार करावेत, ज्यायोगे मानसिक ताण कमी होईल.

५. काही खावेसे वाटले, तर फळे, लाह्या, मखाणा, फुटाणे तसेच सूर्यफूल, भोपळ्याच्या बिया असे पदार्थ तोंडात टाकायला आणून ठेवावेत.

६. ठरावीक काळाने ब्रेक घेऊन शारीरिक आणि मानसिक आराम करावा.

७. ताणतणाव कमी करण्यासाठी दीर्घ श्वासाचे व्यायाम करणे, झोपण्यापूर्वी एक तास कुठलेही स्क्रीन न वापरण्यावर भर द्यावा.

८. स्वतःचे टाइमटेबल आखावे. काम, जेवण आणि व्यायामाच्या वेळा या बाबत आग्रही राहावे.

उदरभरण नोहे...

- जेवणाआधी दीर्घ श्वास घेऊन ऑफिसचा विषय आणि लॅपटॉप दूर ठेवावा.

- सावकाश बसून चावून खावे आणि घरी तयार केलेला परिपूर्ण, ताजा सकस, गरम आहार करावा. त्यासाठी कमीत कमी वीस मिनिटे देणे आपल्याला सहज शक्य आहे.

- जेवताना समोर टीव्ही किंवा मोबाइल नसावा.

- कुटुंबासोबत गप्पा मारत आनंदी वातावरणात जेवावे.

- समोर वाढलेल्या अन्नाचा आस्वाद घ्यावा, तरच ते अंगी लागले.

म.टा.

अर्चना रायरीकर

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)


संकलित.

No comments:

Post a Comment